

नालासोपारा : विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिकरित्या जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटनास्थळी कुठलीही चिठ्ठी पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. तर त्यांनी जीवन संपवले नसून खून असल्याचा आरोप मयत आदित्यच्या वडिलांनी केला आहे.
शाम घोरई (20) आणि आदित्य राज सिंग (21) अशी मृत मुलांची नावे आहेत. बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुऱक्षारक्षकाला जोरदार काहीतरी पडल्याचा आवाज आला. दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळी अर्नाळा सागरी पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी पाठविण्यात आले आहेत.
ही दोन्ही मुले नालासोपारा येथील आचोळे परिसरात रहात होती. ते दोघे नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात होते. त्यांनी जीवन का संपवले त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही याबाबत तपास करत आहोत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, अर्नाळा सागरी पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा दावा
ही जीवन संपवल्याची घटना नसून या दोघांची हत्या असल्याचा आरोप मयत आदित्य सिंगचे वडील राज सिंग यांनी केला आहे. काल संध्याकाळी तीन मुले राज सिंग यांच्या घरी आली होती. दोघेजण खाली थांबले होते आणि एक जण त्यांच्या मुलासोबत घरी आला होता. त्यावेळी या त्याच्यासोबत आलेल्या दोघांनी चला वृंदावन गार्डनला फिरून येऊया असे म्हणत घरी चहा पाणी पिऊन जे निघाल. त्यानंतर त्यांच्या पत्नीने मुलाला फोन केला असता दहा मिनिटात परत येतो असे सांगितल्याचे राम सिंग यांनी सांगितल. तीन-साडेतीन वाजता तिन्ही मुलांचे फोन बंद येत होते. सगळीकडे परिसरात आजूबाजूला शोध शोधून थकले त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. दरम्यान,ही जीवन संपवल्याची घटना या दोघांची हत्या असल्याचा आरोप राज सिंग यांनी केला आहे.