

पालघर : पालघर जिल्ह्यातील येऊ घातलेल्या तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची यादी जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांची धावपळ वाढली असून पक्षांची सुद्धा चाचपणी आता सुरू होणार असल्याचे यातून दिसून येत आहे.
मुदत संपून प्रशासक काम पाहत असलेल्या पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद ओबीसी म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण तर जव्हार नगर परिषद नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे तर वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला असे राखीव करण्यात आल्याने ज्या ठिकाणी महिला आरक्षण पडले त्या ठिकाणी आतापर्यंत इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांची मात्र निराशा झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील कार्यकाळ संपण्यासाठी अजून दोन वर्षाचा अवकाश असलेल्या विक्रमगड, मोखाडा आणि तलासरी या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सुद्धा जाहीर झाले आहे. यामध्ये विक्रमगड नगरपंचायत ओबीसी, मोखाडा नगरपंचायत ओबीसी आणि तलासरी नगरपंचायत ओबीसी महिला असं राखीव झाल आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील एकही नगरपरिषद किंवा नगरपंचायत नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती साठी राखीव नसल्याचे सुद्धा यावेळी दिसून येत आहे. पालघर डहाणू आणि जव्हार नगरपरिषद तर वाडा ही नगरपंचायत या चार ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासक काम पाहत असल्याने या ठिकाणी निवडणुका होणे आवश्यक होते तशी चाहूल लागल्याने आरक्षणाचा अंदाज लावत अनेक उमेदवारांनी मगील झालेल्या सार्वजनिक उत्सवात बॅनरबाजी करून आपण इच्छुक असल्याचे दाखवून दिले होते तर काही गुडघ्याला बाशिंग बांधून काम सुद्धा करीत असल्याचे दिसून आले होते मात्र आता या चारही जागेचे आरक्षण जाहीर झाल्याने पक्षीय मंडळी सुद्धा यासाठी पात्र ठरेल अशा उमेदवारांच्या शोधात आहेत तर ज्या घरातील पुरुष आजवर इच्छुक होते त्यांच्या घरातील महिला सुद्धा आता या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतर राजकारणात अचानक पणे पडण्याची शक्यता आहे यामुळे इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे यात दुमत नसले तरी पक्षीय मंडळींची सुद्धा तिकीट वाटप करताना दमच्याक होणार असल्याचे दिसून येत आहे. तर कार्यकाळ संपायला तब्बल दोन वर्ष वेळ असलेल्या विक्रमगड मोखाडा आणि तलासरी या ठिकाणी आरक्षण आजच जाहीर झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी असेल तर इच्छुक उमेदवारांना काम करण्यास आपण उमेदवारीसाठी कसे लायक आहोत हे दाखवण्यासाठी मोठा कालावधी मिळणार असल्याने इच्छुकांची संख्या अधिक वाढणार आहे.
आरक्षण जाहिर
पालघर नगरपरिषद - नागरिकाचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
डहाणू नगरपरिषद - सर्वसाधारण
जव्हार नगरपरिषद - सर्वसाधारण महिला
वाडा नगरपंचायत सर्वसाधारण महिला
मोखाडा नगरपंचायत नागरिकाचा मागास प्रवर्ग (ओबीसी):- कार्यकाळ संपणे बाकी
विक्रमगड नगरपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी):- कार्यकाळ संपणे बाकी
तलासरी नगरपंचायत नागरिकाचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला कार्यकाळ संपणे बाकी