

नालासोपारा : वसई, विरार मध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुलांचा खदानीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान अनेक ठिकाणी असलेल्या उघड्या खदांनीमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे.
विरार पूर्व येथील हनुमान मंदिराच्या मागील नालेश्वर नगर परिसरात खदानीच्या पाण्यात बुडून 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आर्यन चव्हाण 10 हा परिसरातील इतर मुलांसोबत खदानीजवळ खेळण्यासाठी गेला होता.
खेळताना तो अचानक खदानीच्या पाण्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर वसई पूर्व येथील राजावली परिसरात खदानीच्या पाण्यात बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी यांचा नातू आयान ताज मोहम्मद मनिहार 15 याला होळी व धुळवड सणानिमित्त शाळेला सुट्टी असल्याने 4 मार्च रोजी सकाळी होळी खेळण्यासाठी जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्री 9 वाजेपर्यंत घरी परतला नाही. यानंतर कुटुंबीयांकडून त्याचा शोध घेण्यात येत असताना 6 मार्च रोजी राजावली येथील खदानीत त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.