

वाडा : वाडा शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढली असून दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्याही भीतीदायक असून रोजच श्वानांच्या हल्ल्यात कुणी न कुणी जखमी होत असल्याची तक्रार समोर येतं आहे. श्वानांवर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसी देण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. वाडा शहरात आता पुन्हा श्वानांची संख्या वाढली असून निर्बीजीकरण मोहिमेलाही ब्रेक लागण्याचे बघायला मिळत आहे. प्रशासन श्वानांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अयशस्वी ठरत असून दिले जाणारे आकडे देखील चकवा देणारे आहेत असे लोकांचे म्हणणे आहे.
वाडा शहरात भटक्या श्वानांची मोठी दहशत निर्माण केली असून लोकांना पायी फिरणे अवघड बनले आहे. दुचाकीवर पण हे श्वान हल्ला करीत असून शेकडो लोकांना आजपर्यंत श्वानांनी जखमी केल्याची नोंद आहे. नगरपंचायतीने श्वानांची वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे व त्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करणे यासाठी युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर नामक एका कंपनीला याबाबत कंत्राट देण्यात आले. श्वानांना पकडुन त्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधक लस देणे असे काम केले जाणारं होते.
कानाला काप घेऊन, गळ्यात पट्टे बांधून शस्त्रक्रिया झालेल्या श्वानांची वेगळी ओळख ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र वाडा शहरात आता कुठेही शस्त्रक्रिया झालेले श्वान बघायला मिळत नाहीत. भटक्या श्वानांनी तर मोठा उच्छाद मांडला असून जागोजागी श्वानांचे हे झुंड भितीचे वातावरण निर्माण करीत आहेत. नगरपंचातीच्या या मोहिमेला तर आता ब्रेक लागला असून भटक्या श्वानांपासून बचाव करायचा तरी कसा असा प्रश्न लोकांना पडला आहे.
आतापर्यंत 565 श्वानांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून एका श्वानाला 1650 इतका खर्च येतो. श्वानांची संख्या अमर्याद असून बहुधा बाहेरील श्वान शहरात येत असल्याने ही संख्या वाढतच चालली आहे, सध्या निधीची तरतूद नसून वेदांत फाउंडेशन या संस्थेमार्फत मात्र मोफत लसीकरण सुरू आहे.
मनोज पष्टे, मुख्याधिकारी , वाडा नगरपंचायत.