

विरार : वसई परिसरात सध्या तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसातील तीव्र उष्णता, हवामानातील अचानक बदल, वाढते प्रदूषण तसेच पावसाळ्यापूर्वी निर्माण होणारी दमट परिस्थिती याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. परिणामी खाजगी तसेच शासकीय दवाखान्यांत ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि थकवा अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आधीपासूनच मधुमेह, दमा, रक्तदाब यांसारख्या आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण तापाच्या समस्येला अधिक बळी पडत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अनेक रुग्णांना दोन ते तीन दिवस ताप कायम राहत असून, वेळेवर उपचार न झाल्यास आजार गंभीर स्वरूप धारण करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामानातील चढउतारामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत असून, दूषित पाणी, अस्वच्छ परिसर आणि वाढते प्रदूषण यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढला आहे. याशिवाय बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यात शरीराला अडचणी येत असल्याने नागरिक वारंवार आजारी पडत आहेत.
दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तापाकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा, स्वच्छ पाणी पिणे, पुरेशी विश्रांती घेणे, संतुलित आहार घेणे आणि अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कोणतीही लक्षणे जाणवताच स्वतः औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सध्या हवामानातील बदलामुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ताप दोन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास किंवा अंगदुखी, थकवा, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी स्वतःहून औषधे घेणे टाळावे आणि स्वच्छता व पाणी पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. \
ज्ञानेश्वर टिपरे, डॉक्टर.