One district one rate farmer: एक जिल्हा, एक भाव मागणीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत निद्रा आंदोलन
वाडा : पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा व विक्रमगड तालुक्यातून विद्युत वाहिन्या नेण्यासाठी टॉवर उभारले जात असून अनेक कंपन्यांचा यात सहभाग आहे. शेतकऱ्यांना मात्र वेगवेगळे भाव देऊन जमिनी हस्तांतरित केल्या जात असून वृक्षांची बेसुमार तोड सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. धर्मवीर विचार मंचाच्या सहकार्याने शेकडो शेतकरी वाडा प्रांत कार्यालयावर सोमवारी धडकले असून बेमुदत निद्रा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकरी सध्या विद्युत वाहक मनोरे उभारणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराने बेजार होऊ लागले असून याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. वाडा प्रांत कार्यालयावर जवळपास 28 दिवसांचे बिऱ्हाड आंदोलन करूनही शेतकऱ्यांच्या हाती केवळ आश्वासनांचे गाजर लागल्याने शेतकरी संतापले आहेत. धर्मवीर विचार मंचाच्या सहकार्याने शेकडो शेतकरी पुन्हा एकत्र आले असून सोमवारपासून बेमुदत निद्रा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
28 दिवस आंदोलन करूनही दखल नाही
एक जिल्हा, एक भाव ही या आंदोलनातील प्रमुख मागणी असून अन्यही मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. 28 दिवस आंदोलन करूनही शासन कोणतीही दखल घेत नसल्याने सरकारची गेंड्याची कातडी आता लोखंडाची बनली आहे का असा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी सवाल विचारला आहे. कंपन्या अरेरावी करीत असून वनविभागाच्या डोळ्यासमोर बेसुमार वृक्षतोड सुरू आहे, पालकमंत्री जनता दरबारात एक भूमिका घेत असून माघारी शेतकऱ्यांची गळचेपी करणारी भूमिका घेतात हा अन्याय आहे असेही पष्टे यांनी आरोप केले आहेत.

