

वसई : वसईतील वाहतूक कोंडी आणि वाहतुकीशी संबंधित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक पोलीस , वसईतील पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक वसई - विरार शहर महानगर पालिकेच्या मुख्यालयात पार पडली. या बैठकीत वसई विरार मधील वाहतूक कोंडीच्या गंभीर प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आमदार स्नेहा दुबे पंडित आग्रही दिसून आल्या असून, बाराही महिने शहरातील रस्त्यालगतच्या बंद स्थितीतील, तसेच काही विशिष्ट दुकांनांसमोर नियमबाहय व अस्ताव्यस्त पार्क केलेल्या वाहनांतून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वसईची सुटका होण्याची सुचिन्हे आहेत.
वसईतील वाहतूक कोंडीचा अत्यंत जटील आणि मागील कित्येक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला असून, महानगर पालिका क्षेत्रातील एस.टी. डेपोंच्या जागेचा पीपीपी तत्वावर विकास करून तेथे पे अँड पार्क व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न निकाली निघणार आहे.
तथापि , दरम्यानच्या काळात अपुरी आणि कालबाह्य सिग्नल व्यवस्था , पुरेसे स्पीडब्रेकर नसणे, झेब्रा क्रॉसिंग नसणे यामुळे नागरिकांना विशेषतः वयोवृद्ध जेष्ठ नागरिक , महिला , विद्यार्थी यांना दररोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.
या बैठकीमध्ये महानगर पालिका क्षेत्रातील बऱ्याचशा मुख्य रस्त्यावर पुरेसे स्पीड ब्रेकर नसल्याचे तसेच अस्तित्वात असलेल्या स्पीड ब्रेकर वर सफेद रंगांचे पट्टे नसल्याने त्यावर वाहने आदळत असल्याचे त्याचप्रमाणे मुख्य चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने नागरिकांना रस्ता क्रॉस करताना येणाऱ्या अडचणीची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली.यावर याबाबत त्वरीत पाहणी करून या मुद्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे या अधिकाऱ्यांनी आश्वासित केले.
या चर्चेमध्ये रस्यांच्या कडेला बंद स्थितीत उभी असलेली वाहने , काही विशिष्ट दुकांनांसमोर नियमबाहय व अस्ताव्यस्त पार्क करण्यात येणारी वाहने यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांना रहदारीमध्ये येणारी अडचणसुद्धा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले - हातगाड्या सुद्धा वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याने लवकरात लवकर फेरीवाला धोरण निश्चित करण्याचे व तोपर्यंत बेकायदा फेरीवाल्यांवर परिणामकारक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीस वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित, वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, मीरा भाईंदर वसई विरार सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शंकर इंदलकर, विरार वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश शेट्ये, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई अतुल आदे, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई दिपक उगले, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.