

खानिवडे: यंदा मान्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनानंतर सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वसई तालुक्यातील भातशेतीला बसला. अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे वाहून गेल्याने रोपांची उगवण कमी झाली.
त्यातच गेल्या आठवडाभराच्या संततधार पावसामुळे आवणीची कामे खोळंबली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेताच शेतकरी पुन्हा जोमाने भात लागवडीच्या कामाला लागले असून शिवारात आवणीची लगबग वाढली आहे.
सध्या अनेक शेतांमध्ये रोपांची खणणी, मूठ बांधणी, चिखललेल्या खाचरांमध्ये रोपांची वाहतूक आणि ओणवे होऊन आवणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही लागवडीसाठी आवश्यक मजुरांची तीव्र टंचाई शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा भात लागवडीकडे पाठ फिरवली आहे. भातशेतीतील वाढता खर्च, मजुरांवरील अवलंबित्व आणि अनिश्चित हवामान यामुळे अनेकांनी नगदी रब्बी पिके, भाजीपाला आणि फळबागांकडे मोर्चा वळविला आहे.
दरम्यान, ज्या शेतांमध्ये लागवड सुरू आहे, तेथील मजुरांना मजुरीसोबत न्याहारी, चहा, जेवण व इतर सुविधा देऊन त्यांना टिकवून ठेवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे भात लागवडीचा खर्चही वाढला आहे.
यंदा अनेक रोपवाटिकांमध्ये पेरलेले बियाणे वाहून गेल्याने रोपांची उगवण पातळ झाली आहे. तयार रोपे असूनही अतिवृष्टीमुळे आवणी रखडली होती. आता हवामान अनुकूल होताच उर्वरित लागवड वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेत असून, यंदाचा भात हंगाम वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.