

वसई : वसई तहसील कार्यालयावर महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत असलेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र व शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.
भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष सुशांत श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने हे आंदोलन पार पडले. सकाळी 11 वाजल्यापासून तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी पारंपारिक तारपा नृत्य सादर करत “भूमिपुत्र एकजूट विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाद्वारे सातबारा उतारा दुरुस्ती, फेरफार नोंद, वारस नोंद यांसह विविध महसूल कामांमध्ये होत असलेली दिरंगाई, तसेच नागरिकांना कराव्या लागणाऱ्या वारंवार चकरा याकडे लक्ष वेधण्यात आले. शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान” या योजनेचा अधिक प्रभावी प्रचार व अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष,सामाजिक व भूमिपुत्र संघटनांचा पाठिंबा लाभला. तहसीलदार दिपक गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबधीत मुद्द्यांसबधी आश्वासन दिले.