

वाडा : मच्छिंद्र आगिवले
एसटी. महामंडळाच्या बहुतांश बसगाड्या कालबाह्य झाल्या असून भंगार बस प्रवाशांची कंबरमोड करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. चालकांसाठी देखील गाड्या इच्छित स्थळी घेऊन जाणे जिकिरीचे बनले असून कमी दृश्यमानतेच्या हेडलाईट रात्रीच्या वेळी अपघातांना आमंत्रण देत आहेत.वाडा आगारासह जिल्ह्यातील विविध आगाराच्या चालकांना प्रवास सुकर व सुरक्षित करण्यासाठी स्वतःची पदरमोड करून एल.इ.डी. लाईट लावण्याची वेळ आली असून याबाबत परिवहन विभागाने गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाडा आगाराकडे स्वतःच्या जवळपास 47 बसगाड्या असून यातील बहुतांश गाड्या अखेरच्या घटका मोजीत आहेत. पूर्वी गाड्यांना मोठ्या व वर्तुळाकार हेडलाईट येत असत मात्र अलीकडे गाड्यांना लहान आकाराच्या लाईट येतात. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असल्याने गाड्यांची अक्षरशः हाडे खिळखिळी होतात. अनेक गाड्यांच्या हेडलाईटची दृश्यमानता अतिशय कमी झाल्याने त्या उजेड फेकतात कुठे हेच चालकांना समजत नाही.
खड्ड्यातून वाट काढताना कमी उजेडामुळे चालकांना नाकीनऊ येत असून अंदाजावर गाड्या चालविणे धोक्याचे बनते असे अनेक चालक सांगतात.रात्रीच्या वेळी प्रवास करणार्या चालकांनी विशेषतः आता आपली पदरमोड करून एल.इ.डी. लाइट्स लावून घेतल्या आहेत ज्या ड्युटी संपली की काढून घरी घेऊन जाण्याची व्यवस्था केली जाते. वाडा आगारातील जवळपास 25 ते 30 चालकांवर अशी वेळ असल्याचे काही चालक सांगतात. खरेतर अशा पद्धतीने बाहेरून एल.इ.डी. लाइट्स लावणे बेकायदेशीर व समोरून येणार्या अन्य वाहनांसाठी अतिशय धोक्याचे आहे मात्र प्रवास सुकर करण्यासाठी चालकांवर ही दुर्दैवी वेळ येत असल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे परिवहन मंत्री एकीकडे तंत्रज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा करीत असून आपल्या नातवासाठी महागड्या गाड्या गिफ्ट करतात मात्र आपल्या विभागातील कर्मचार्यांच्या कुटुंबासाठी त्यांचा आधार असलेले कर्मचारी तसेच हजारों प्रवासी धोकादायक प्रवास करतात याकडे लक्ष घालणार का असा सवाल विचारला जात आहे. राज्यातील अनेक बस गाड्यांच्या चालकांना याच समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे काही अधिकार्यांनी सांगितले आहे.
वरिष्ठ पातवरिष्ठ पातळीवरून जे साहित्य पुरविले जाते तेच वापरले जाते, गाड्यांच्या हेडलाईटचा विषय अनेकदा बैठकींमध्ये चर्चेत येतो. याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यायला हवी मात्र विभागाकडे याबाबत लेखी कळविले जाईल.
भूषण बेंद्रे, एस.टी. आगार व्यवस्थापक, वाडा.