

डोंबिवली : पूर्वेकडील कल्याण रोडला असलेल्या शेलार नाक्यावर तुळजाभवानी तरूण मित्र मंडळातर्फे दुर्गामातेचा नवरात्रौत्सव सुरू आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास दुर्गा देवीची आरती सुरू होती. इतक्यात त्याच झोपडपट्टीत राहणार्या एका कोयताधारी गुंडाने दहशत पसरवून परिसरातील रहिवाशांना घाबरून सोडले.
अतुल अडसूळ असे या गुंडाचे नाव असून तो याच भागातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. अतुल विरूध्द इंदिरानगरमध्ये राहणार्या नामदेव कदम (58) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार रामनगर पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात नामदेव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून शेलार नाक्यावर तुळजाभवानी तरूण मंडळातर्फे दुर्गा देवीचा उत्सव साजरा केला जातो.
आदल्या दिवशीच्या रात्री झालेल्या भांडणाचा राग आणि त्यानंतर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात ठेऊन अतुल हा गुंड तक्रारदार नामदेव कदम यांना शिवीगाळ करत हातात कोयता घेऊन देवीच्या मंडपात घुसला. त्याने मोठ्याने आरडाओरडा करत नामदेव कदम यांच्या गळ्याला कोयता लावला. कुणी नामदेव यांना वाचविण्यासाठी मधे पडल्यास त्यालाही सोडणार नाही, अशा धमक्या देत कोयता हवेत फिरवून उपस्थितांमध्ये दहशत निर्माण केली. या सगळ्या प्रकाराने परिसरात प्रचंड भीती आहे.