

तलासरी: पावसाची चाहूल लागताच मान्सूनपूर्व खरेदीला सुरवात झाली असून परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची आठवडी बाजारात लगबग दिसत आहे. तालुक्यातील आजूबाजूच्या गाव खेड्यापाड्यावरील आदिवासी बांधव व शेतकरीवर्ग शेतीपूर्व कामाला लागतो. त्यामुळे त्याला तीन ते चार महिने बाजार हाट करता येत नाही.
पावसाळ्यात शेती हंगाम सुरु झाल्यावर बाजारत जावून खरेदी करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे तो मान्सूनपूर्व चौमासाची (पावसाळ्याच्या हगामाला) खरेदी करून ठेवतात. या चौ- मासासाठी सुकी मासळी, मसाले, कडधान्ये, डाळी, हळद, कांदे, बटाटे, चिंच, कोकम, फाटी, जनावरांसाठी पेंढा अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून तीन ते चार महिने पुरेल असा साठा करून ठेवतो.
तालुक्यात ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी आदिवासी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होवू लागली आहे. आज महागाईचा भस्मासुर थैमान घातला असतानाही खरेदी मात्र केली जात आहे. कारण तीन महिने शेती हंगाम सुरु झाल्यावर येथे लागणाऱ्या वस्तू आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरिता अडचणी निर्माण होत असतात. कारण ग्रामीण भागात पावसाळ्यात पाहिजे ती वस्तू मिळत नाही.
गुजरात राज्यामधील उबरगाव, संजान, खतलवाडा, मरोली, फणसा आदी भागातून सुकी मासळी विक्रेत्या महिला परिसरातील तलासरी, उधवा, धुंदलवाडी, बोरमाळ, आच्छाड,उपलाट आमगाव, झरी इत्यांदी गावात आठवडे बाजार भरत असून बाजारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
या बाजातात दाढा, सुरमई,घोळ, मुशी, करली, मांदेली, बोंबील, जवळा, कोळंबी, वागटी, बांगडे, कोळीब, सुकट, खारे, लसिंगे अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळीचा समावेश असून त्याला मागणीही चागली आहे.
आदिवासी महिला भात व कडधान्ये देवूनही सुक्या मासळीची खरेदी करीत असतात. या महिन्यात जोरदारपणे विक्री सुरु असल्याने सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत आसतो. त्यामळे या आठवडे बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
यंदा सुकी मासळी दुपटीने महागली असून दाढा 1500 ते 1600 रुपये प्रति किलो, सुरमई 1300 ते 1400 रुपये प्रति किलो, बोंबील 600 ते 800 किलो. जवळा 100 ते 150 वाटा, कोळंबी 150 ते 200 वाटा सुके मासे दुपटीने महाग झाले असले तरी यावर पावसाला काढायचा असल्याने तिची खरेदी सुरु आहे.