

हनिफ शेख
पालघर: ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता शेवटच्या क्षणी वाढली असून आत्तापर्यंत सहकारात पक्ष नसतो असे सांगत राजकारणाची खिचडी झालेल्या या निवडणुकीत आता मात्र पक्षाने थेट भूमिका घ्यायला सुरुवात केल्याचे एकूणच दिसून येत आहे.
यातूनच आता मोठा गोंधळ निर्माण झाला असून सहकार पॅनल कडून निवडणूक लढत असलेले उमेदवार ज्योती दिलीप पटेकर यांनी थेट पॅनल बदलल्याचे दिसून येत असून त्यांचे पती दिलीप पटेकर हे भाजपाचे पदाधिकारी असून ते सुरुवातीपासूनच किसन कथोरे, हितेंद्र ठाकूर यांच्या पॅनल मधूनच निवडणूक दरवेळी लढवत असतात.
यावेळी देखील तशीच परिस्थिती होती एवढेच काय तर सहकार पॅनलच्या प्रसिद्धी पत्रकावर ज्योती पटेकर यांचा फोटो देखील प्रसिद्ध झालेला होता.मात्र यानंतर भाजप पक्षाकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढल्याची चर्चा असून यातूनच हा पॅनल बदल झाल्याचे आता दिसून येत आहे. यामुळे सुरुवातीला अगदी सोपी वाटणारी निवडणूक आता चुरशीची ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सहकार पॅनेलची धावपळ वाढली आहे.
यामुळे आता कृषी पतपुरवठा म्हणजेच तालुका निहाय जे संचालक निवडून जाणार होते त्यामधून सहकार पॅनलचा जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात उमेदवारच नसल्याचे आता समोर येते आहे तर विक्रमगड तालुक्यातून लढत असलेले संदीप पावडे आणि जव्हार मधील ज्योती पटेकर हे परिवर्तन पॅनलला जोडले गेल्यामुळे पटेकर यांच्यासमोर लढत असलेले काँग्रेसचे बळवंत गावित आणि विक्रमगड मधून पावडे यांच्या समोर लढत असलेले सुनील पाटील या उमेदवारांना सहकार पॅनल गळाला लावते काय हेही पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
तर पालघर मधून लढणारे अनिल गावड हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत मात्र त्यांच्यासमोर सहकार पॅनलचा उमेदवार असल्याने गावडे यांना देखील परिवर्तन पॅनल कडून बळ मिळणार असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला ही निवडणूक पक्ष विरहित असल्याचे दिसून येत होते मात्र आता जशी मतदानाची वेळ जवळ येत आहे तसतशी यामध्ये पक्षीय सहभाग देखील सक्रिय वाढल्याचे दिसून येत आहे थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील यामध्ये लक्ष घालण्याचे बोलले जात आहे त्यातूनच सहकार पॅनल मधील हा उमेदवार थेट परिवर्तन पॅनल मध्ये गेल्याचे समोर आले आहे.
दि ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली आहे. या निवडणुकीच्या विविध मतदारसंघातून एकूण 55 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 29 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विविध राजकीय पक्षांची एकत्र मोट बांधून करण्यात आलेल्या सहकार पॅनल आणि भाजप शिवसेना महायुती पॅनलच्या उमेदवारांमध्ये थेट लढती या निवडणुकीत होत आहेत.
अशा असतील लढती .....!
प्राथमिक कृषी पतपुरवठा या मतदारसंघात जव्हार मध्ये ज्योती दिलीप पटेकर आणि बळवंत शंकर गावित यांच्यात थेट लढत होत आहे. पालघर मध्ये उत्तम पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता अनिल गावड आणि नागेश पाटील यांच्यात लढत होणार आहे. शहापूर मध्ये अरुण पानसरे आणि सुभाष हरड यांनी उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे आता प्रकाश वरकुटे विद्या वेखंडे आणि अनिल निचिते हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विक्रमगड मध्ये तिन्ही उमेदवारी अर्ज कायम आहेत सुनील पाटील, निलेश सांबरे आणि संदीप पावडे या तिघांमध्ये ही लढत होणार आहे. पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था मच्छीमार सहकारी संस्था अशा विविध संस्थांच्या प्रतिनिधी मतदारसंघातून आठ उमेदवारांनी माघार घेतली असून आता विशाल कुऱ्हाडे, प्रभू पाटील आणि शेखर निकम निवडणूक रिंगणात आहेत.
खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था सह इतर संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या मतदारसंघात १० उमेदवारांनी माघार घेतली असून, सिताराम राणे,सत्यवान पाटील आणि रंभाजी जगताप हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.इतर मागास वर्गातील सदस्य या मतदारसंघातून 14 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे प्रकाश भोईर, निलेश सांबरे,कैलास पाटील, स्वप्नील मुंबईकर आणि हार्दिक राऊत हे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.