

वसई: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी पूर्वी पालघर आणि ठाणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले होते. जिल्हा बँकेवर गेली १० वर्षे सहकार पॅनलची सत्ता असून, त्यात बहुपक्षीयांच्या युतीमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा सहभाग आणि योगदान महत्वाचे होते.
मत मोजणीत सहकार पॅनलने २१ पैकी पालघर जिल्ह्यातून 8 जागासह एकूण १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यात वसईतून 4 जागा जिंकत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचा करिष्मा अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे.
ठाणे जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने प्रतिष्टेची केली होती. या निवडणुकीत पॆसे वाटपाच्या मोठ्या प्रमाणत तक्रारी झाल्या होत्या. तर या निवडणुकीत एक मत आम्हाला बाकी कोणालाही द्या असा प्रचार वसई-विरारमध्ये करण्यात आला असतांनाही ती जादू चालली नाही. त्याच बरोबर भाजपचे दोन्ही आमदार निवडणुकीच्या प्रचारात उतरले असतानाही परिवर्तन पॅनलला मतदारांनी नाकारले असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी सर्व मतदार संघ पिंजून काढले होते. त्यामुळे जिल्हा बँकेत सहकार पॅनलला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकी पूर्वी बहुजन विकास आघाडीतील माजी नगरसेवकाणे परिवर्तन पॅनलमधून उमेदवारी घेतल्याने येथील वातावरण चांगलेच तापले होते. प्रचाराच्या वेळी हितेंद्र ठाकूर यांनी जे सोडून गेले त्यांच्यावर काढून टाकण्याची कारवाई करण्याचे संकेत दिल्याने हि निवडणूक वसई विरारमध्ये चर्चेची झाली होती.
पालघर जिल्ह्यातून निवडून आलेले उमेदवार
सुनील भुसारा, अमित घोडा , निवृत्ती घुसेकर, बळीराम जाधव, दत्तू रड्या, मनीष पाटील, भाग्यश्रे भोईर, नीता कांबळी