

मुरबाड शहर: मुरबाड तालुक्यातील कोलठण गावात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात अत्यंत दूषित आणि गढूळ पाणी येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ग्रामस्थांच्या घरातील भांड्यात येणारे पाणी इतके अस्वच्छ आहे की, ते पिणे तर दूरच, कपडे धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठीही योग्य नसल्याच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.
अशा दूषित पाण्यामुळे गावात अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, त्वचारोग तसेच इतर साथीच्या आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाकडून गावोगावी पाणीपुरवठा योजनांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. ग्रामपंचायतींकडूनही पाणी शुद्धीकरणासाठी विविध प्रकारचे केमिकल, पावडर आणि स्वच्छता प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात खर्च दाखवला जातो.
मात्र प्रत्यक्षात ग्रामस्थांच्या नळातून असे दूषित पाणी येत असेल, तर या संपूर्ण व्यवस्थेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामपंचायतींकडून पाणी स्वच्छतेचा ढोल बडवला जात असताना कोलठण गावातील ही परिस्थिती संपूर्ण व्यवस्थेची पोलखोल करणारी ठरत आहे.
या प्रकाराची पाणीपुरवठा विभागाने तातडीने गंभीर दखल घेऊन पाण्याची गुणवत्ता तपासावी आणि नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.