

बोईसर ः तारापूर औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मुख्य जलवाहिनी गुरुवारी दुपारी अचानक फुटल्याने सुमारे 1200 उद्योग आणि 15 ग्रामपंचायतींवर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली असून उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली होती.
एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून तारापूर औद्योगिक क्षेत्राकडे 1000 मिमीच्या मुख्य जलवाहिनीद्वारे दररोज सुमारे 70 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास बोईसर पूर्वेतील वारांगडे परिसरात, विराज कंपनीजवळ ही जलवाहिनी फुटली. जमिनीखाली साधारण 10 ते 12 फूट खोल असलेल्या या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडू लागल्याने परिसरात बराच वेळ गोधंळाची स्थिती निर्माण झाली होती.या मुळे बराचवेळ पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता.
घटनेची माहिती मिळताच तारापूर येथील एमआयडीसीच्या देखभाल आणि दुरुस्ती उपविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीची कामे सुरू केली होती. हे काम सुरू असताना पाणीपुरवठा पूर्णपणे थांबवावा लागला असल्याने उद्योग आणि ग्रामपंचायतींना 7 ते 8 तास अडचणींचा सामना करावा लागला होता. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्रीपर्यंत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एमआयडीसीतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.