

पालघर ः वसई तालुक्यातील नायगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात मालजीपाडा गावाच्या हद्दीतील खाडी किनारच्या झूडपात सुरु असलेले हातभट्टी दारू निर्मिती केंद्र उद्धस्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.हातभट्टी निर्मिती केंद्रावरील कारवाईत हातभट्टीची दारू आणि हजारो लिटर रसायन मिळून तीन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या विरार निरीक्षक कार्यालय आणि भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.खाडी किनारच्या झुडपात हातभट्टी दारू निर्मिती केंद्र सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाचे विरार निरीक्षक कार्यालय आणि भरारी पथकाकडून संयुक्तपणे हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापा टाकण्यात आला.
दारू आणि रसायन जागीच नष्ट करण्यात आले. कारवाई दरम्यान तीन लाख 90हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या विरार कार्यालयाचे निरीक्षक संजय सराफ यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक महेश तावरे, जवान रोहन मार्टिस,अनिल पाटील,संजय बोडके,आणि यश बिरारी यांच्या पथकाने केली.