Talasari Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! तलासरीत 19 वर्षांच्या तरुणीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार

गुजरातवरून परतताना तरुणीचे अपहरण; तलासरीत खळबळ
Talasari Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! तलासरीत 19 वर्षांच्या तरुणीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार
Published on
Updated on

सुरेश वळवी

तलासरी : तलासरी तालुक्यातील काजळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या (डाक बंगला) ओट्यावर एका १९ वर्षीय तरुणीवर सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना रविवारी (दि. ९) रात्री घडली. या प्रकरणातील पीडित तरुणीने स्वतःची सुटका करून घेत दाखवलेल्या धाडसामुळे आणि काही दक्ष तरुणांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

अशी उघडकीस आली घटना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री काजळी येथील विश्रामगृहाच्या ओट्यावर सहा नराधमांनी तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणातून तरुणीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि ती महामार्गाच्या बाजूला येऊन उभी राहिली. रात्रीच्या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या काही तरुणांना ही मुलगी रडताना दिसली. त्यांनी गाडी थांबवून तिची विचारपूस केली. मुलीने घडलेला प्रसंग सांगताच तरुणांनी वेळ न गमावता तातडीने '११२' या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

Talasari Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! तलासरीत 19 वर्षांच्या तरुणीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार
Palghar Family Dispute Case: पालघरमध्ये कौटुंबिक कलहातून विष प्राशन आईचा मृत्यू; दीड वर्षाच्या बालिकेची मृत्यूशी झुंज

याबाबत मुलीच्या प्रियकरालादेखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. प्रियकराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आणि प्रियकर हे गुजरात येथे फिरायला गेले होते. तेथून परतताना आमगाव फाटा येथे त्यांची दुचाकी घसरून पडली. त्यावेळी तेथे आलेल्या मोटरसायकलवरील पाच ते सहा तरुणांनी या मुलीला पळवून नेल्याची माहिती प्रियकराने पोलिसांना दिली.

संपूर्ण घटनाक्रम पाहता पोलिसांनी या संदर्भात अतिशय गुप्तता पाळली. प्रियकर तसेच मुलीने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी तत्काळ नितेश अजित गांगड (वय २९ वर्षे, रा. उपलाट) या आरोपीला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Talasari Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! तलासरीत 19 वर्षांच्या तरुणीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार
Palghar FDA Action: पालघरमध्ये दोन महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने केली ६१ आस्थापनांची तपासणी

पोलीस प्रशासनाची वेगवान कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नराळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, तपासानंतर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपी अजूनही फरार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. तसेच घटनास्थळावरून महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली होती.

प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर

ज्या विश्रामगृहात (डाक बंगला) ही घटना घडली, ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. सध्या तिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, इतकी मोठी सरकारी इमारत असूनही तिथे रात्रीच्या वेळी कोणताही सुरक्षा रक्षक किंवा जबाबदार कर्मचारी तैनात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच परिस्थितीचा फायदा आरोपींनी घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, फरार आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Talasari Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! तलासरीत 19 वर्षांच्या तरुणीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार
Palghar Crime News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news