

पालघर शहर: पालघर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने जून आणि जुलै या दोन महिन्यांत राज्यभर सुरू असलेल्या कठोर मोहिमेचा भाग म्हणून पालघर परिमंडळ-०१ मध्ये धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
दोन महिन्यांत प्रशासनाने तब्बल ६१ व्यावसायिक आस्थापनांची कसून तपासणी केली असून, यादरम्यान ५ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तडजोड दंड म्हणून २ लाख ७ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
भेसळ करणाऱ्या आणि नियम उलघंन करणाऱ्यांचे धाबे अन्न प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून दणाणले आहेत.
हॉटेल व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी स्वच्छता, अन्नपदार्थांची सुरक्षितता, भेसळ युक्त अन्नपदार्थांची तपासणी, पेस्ट कंट्रोल (कीटक नियंत्रण), कामगारांची वैद्यकीय तपासणी, उंदरांसाठी ट्रॅप लावणे, अग्निशामक व्यवस्था तसेच वैध परवाना यांसारख्या कडक निकषांच्या आधारे ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.
पालघरमध्ये दोन महिन्यांत अन्न सुरक्षेची कठोर पायमल्ली रोखण्यासाठी प्रशासनाने एकूण ३२ अन्न नमुने तपासणीसाठी घेतले; त्यापैकी ०९ नमुने प्रमाणित आढळले, ०१ नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला असून २२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
याशिवाय, अन्नपदार्थांच्या ४ मोठ्या धाडींमध्ये तब्बल १ कोटी ३२ लाख ८४ हजार ३९४ रुपये किमतीचा ४२,३५३.८ किलोग्रॅम वजनाचा साठा जप्त करण्यात आला, तर गुटखा व पानमसाल्यासारख्या प्रतिबंधित अन्नाविरुद्ध केलेल्या ७ धाडींमध्ये ४ लाख ३२ हजार ३२७ रुपये किमतीचा २५० किलोग्रॅम साठा जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील हॉटेल्समध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर भर देत ग्राहकांना विकतच्या बिसलेरी बॉटलची सक्ती न करता विनामूल्य व पिण्यास योग्य उत्तम दर्जाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
अन्न प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या व्यापक 'पनीर मोहिमेत' अस्सल पनीरसारखाच भासणारा परंतु आरोग्यास घातक असा संशयास्पद पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरला जात असल्याचे उघड झाले.
वसई-विरार भागात धडक कारवाई करत कोटींचे साठे जप्त करण्यात आले असून, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हॉटेल्सच्या प्रवेशद्वारासमोर अस्सल'पनीरपासून बनवलेले पनीर पदार्थ मिळतील असे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.