

खानिवडे : देवगडचा हापूस,नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत तशी पालघर जिल्ह्यातील वसईची केळी, घोळवड चे चिक्कू , वसईचे नागवेलीचे पान हे साता समुद्रापालिकडे सुप्रसिद्ध आहेत.त्याचप्रमाणे वसईतील सुकेळी ही सुप्रसिद्ध आहे.ही सुकेळी सातासमुद्रापार पोहचली आहे. मात्र गेल्या काही वर्षात निर्सगाच्या लहरीपणासोबत अन्य कारणांमुळे सुकेळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण काहीसे कमी होवू लागले आहे.
यातील एकेकाळची वसईची केळी सूकेळीच्या रूपाने सगळीकडे ओळखली जात होती. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे वसईतील केळींवर आलेल्या रोगांमूळे शेतकरी हवालदील झाल्याचा परिणाम आणि याच बरोबर हाकेच्या अंतरावर जागतिक दर्जाचे मुंबई महानगर असल्याने येथे दररोज मोठ्या गतीने होणाऱ्या नागरिकीकरणामुळे शेतीच्या जागी विकासकामे, याचबरोबर येथील पारंपरिक शेतकऱ्यांची शिकली सवरलेली मुले कामधंद्यासाठी देशातील अन्य भागासह परदेशात गेल्याने व पुढील पिढीला शेतीत स्वारस्य नसल्याचा परिणाम वसईतील अन्य पिकांसह सुकेळीवर झाला असून सुकेळी सुकवणारे मोजकेच शेतकरी उरल्याचे चित्र वसईत पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी दरसाल प्रमाणे यंदाही निर्मळच्या यात्रेत ही सुकेळी हमखास पाहायला मिळाली .
गरिबांचे सकस अन्न समजली जाणारी पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख.अशी सुप्रसिद्घ वसईच्या सुकेळीची चव खूद्द वसईकरांना आजही कळलेली नाही, याबद्दल शेतकरी खंत व्यक्त करतात. या केळ्यांमध्ये विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले असल्याने ही केळी पौष्टिक असतात, त्याची आंबटगोड चवही चांगली असते. मात्र त्याबद्दल नवीन पिढीला माहिती नसल्यामुळे जागरुकता होण्याची गरज आहे, असे जुने जाणते शेतकरी सांगतात.यंदा परतीचा पाऊस लांबल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखांचे नुकसान झाले आहे.
आजच्या घडीला मोजकेच शेतकरी सुकेळी बनविण्याचा व्यवसाय करत आहेत. किलोला 500 रूपये,तर गावठी राजेळी 800 रूपये असे वेगवेगळ्या प्रतिनूसार भाव या सुक्यामेव्याला मिळू शकतो . मात्र नैसर्गिक आपत्तीत केळी उत्पादकाला अन्य पिकांप्रमाणे नुकसानभरपाई मिळत नसल्याने हा व्यवहार काहीसा बिनभरवशाचा आहे. त्यात आता वसईची ओळख जपताना मोजकेच उरलेल्या सुकेळी उत्पादक शेतकऱ्यांना महानगरपालिका व शासनानेही मदतीचा हात पुढे करावा जेणेकरून शेतकऱ्यांना एक चांगले व्यवसायाचे साधन निर्माण होईल असे शेतकरी आता सांगत आहेत.