Sativali flyover open for traffic : अहमदाबाद महामार्गावरील सातिवली उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला
पालघर ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरत असलेला सातिवली येथील उड्डाणपुल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. उड्डाणपुलावरून 15 नोव्हेंबरला वाहतूक सुरु करण्याचे नियोजन बारगळल्या नंतर ठेकेदाराने उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबरीकरणासह अन्य कामे वेगाने मार्गी लावली. कामाच्या संथगतीमुळे डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना बुधवारी उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झाली आहे.
सातिवली उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यावर खड्डे पडल्याने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांची गती मंदावत होती. जोड रस्त्यांवर अवजड वाहने नादुरुस्त होत असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय होत होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाचा वेग वाढवण्यात आला होता.काही अपरिहार्य कारणांमुळे उड्डाणपुलावरुन 15 नोव्हेंबर रोजी वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजन बरगळले होते.डेडलाइन हुकल्यानंतर दहा दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
सातिवली उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामामुळे जून महिन्यात महामार्गावर सलग दहा दिवस मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली झाली होती. वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारा विरोधात प्रक्षोभाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार करून उड्डाणपुलाच्या कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली उड्डाणपूल परिसरात वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.उड्डाणपुलाच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले होते. वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्याच्या हेतूने महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांचा पाठपुरावा आणि ठेकेदाराने उड्डाणपुलाच्या कामाचा वेग वाढवल्याने उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे.हा पूल सुरू झाल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सातिवली उड्डाणपुलाचे काम रखडल्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ग्रामस्थ तसेच वाहनचालकांची गैरसोय होत होती.वाहतूक कोंडीमुळे सातिवली येथिल गरम पाण्याच्या कुंड परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या संखेत घट झाली होती. उड्डाणपूल सुरु झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे,. वाहतूक कोंडी संपणार असल्यामुळे कुंड परिसरात पर्यटकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
कृष्ण जाधव, सरपंच, सातिवली-ग्रामपंचायत.

