

वसई : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी 02 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी 2017 पासून दरवर्षी स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा साजरा केला जात आहे. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी “स्वच्छ उत्सव“ हे अभियान राबविण्यास निर्देश दिले आहेत.
स्वच्छ हरित उत्सव व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार (Advocacy for Swachhata) अंतर्गत नुकतीच वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत शाळा/महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकरिता पर्यावरण पूरक (Eco friendly) व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा (Waste to Art) आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये जॉन तेविसावा हायस्कूल विरार, एग्नल शाळा वालीव वसई, रॉयल पब्लिक स्कूल विरार ,कारगिल नगर अंजुमन उर्दू हायस्कूल विरार पूर्व, एन.जी.वर्तक इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज विरार (पूर्व) होली मेरी इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर, विरार या शाळेंनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी तील शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंपासून कागदी कंदील, हार्मोनियम फुलदाणी, टेलिफोन इत्यादी वस्तू बनविण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.