सफाळे : प्रमोद पाटील
पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले नयनरम्य केळवे गाव हे केवळ स्वच्छ, रमणीय समुद्रकिनाऱ्यामुळेच नव्हे तर जागृत शितलादेवी मंदिरामुळेही भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्रस्थान बनले आहे. नवरात्रोत्सव काळात येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असून देवीच्या सजलेल्या रुपाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून भक्तगण मोठ्या भक्तिभावाने येथे दाखल होतात.
भक्तांमध्ये असा दृढ विश्वास आहे की, आदीमाता शितलादेवी नवसाला पावणारी आहे, भक्तांच्या आयुष्यात सौख्य, शांती व समाधानाचा शीतल दरवळ सतत पसरवत असते. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी केळवे गावाला पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी येथे धनुष्यबाण सोडून निर्माण केलेले पवित्र रामकुंड आजही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
महिकावती नगरीतील अही-मही राक्षसांचा वध करून प्रभूनी "कदलीवह" म्हणजेच आजच्या केळव्याला भेट दिली आणि रामकुंडातील पवित्र स्नानानंतर वालुकेश्वराचे स्वयंभू शिवलिंगाचे पूजन केले. तुलसीरामायणातील "युद्धकांड" या भागात या स्थळाचा उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतभरात वाळूतून निर्माण झालेले स्वयंभू शिवलिंग एकमेव येथेच असल्याचे मानले जाते. दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे जत्रा भरते. या जत्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात, सौराष्ट्र, उत्तर प्रदेश यांसह विविध राज्यांतून हजारो भाविक मोठ्या संख्येने येतात.
कालांतराने मंदिर व परिसर जीर्णावस्थेत गेल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. त्यानुसार १० एप्रिल १९८६ रोजी कलशारोहण करण्यात आले. पुढे १० मार्च २००१ रोजी गुरुमाऊली वामनराव पै यांच्या हस्ते रामकुंड सुशोभीकरणाचे लोकार्पण करण्यात आले.
शितलादेवी भाविकांची अखंड श्रद्धा
"नवसाला पावणारी माता" म्हणून शितलादेवीचे भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे. प्रत्येक भाविकाच्या संसारात सुख-समाधान आणि शांती नांदो, अशी प्रार्थना करत भक्त नवरात्रोत्सवात देवीच्या चरणी लीन होतात.