

ST, rickshaw accident in Arnala, woman killed, 1 critical
खानिवडे : पुढारी वृत्तसेवा
विरार पश्चिमेतील अर्नाळा येथे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एस टी च्या लालपरी ने एका प्रवासी रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला. या अपघातात एक महिला ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अर्नाळा शिर्डी बसने अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटी येथे समोरून येणाऱ्या महिला चालकाच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यात कविता कोलगे (५५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मीनाक्षी योगेश पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर बसचा चालक राजू शंकर गांगुर्डे हा घटनास्थळावरून अपघात झाल्यानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महिला रिक्षा चालक पूनम वरठा ही कविता कोलगे, मीनाक्षी पाटील व शिल्पा राऊत या प्रवाशांना घेऊन आगाशी येथून अर्नाळा येथे जात होत्या. तेव्हा अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटी समोर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एसटी महामंडळाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली.
यात कल्पना कोलगे यांचा धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर मीनाक्षी पाटील यांचा पाय तुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना त्वरित विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आरोपी चालक राजू गांगुर्डे यांच्या विरोधात महिला रिक्षाचालक पुनम वरठा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघातात मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.