

वाडा : वाडा बस स्थानकाचे काँक्रीटीकरण मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले मात्र त्यावेळी अपूर्ण कामे अजूनही पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले नाही. बस थांबण्यासाठी नियोजित स्टॉपर धूळखात पडले असून सिन्नर स्थानकात झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती वाडा स्थानकात देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाच्या ढिम्म कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.
वाडा बस स्थानकात काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले मात्र त्यानंतर बस एका विशिष्ट जागी थांबण्याचा इशारा म्हणून उभारण्यात येणारे लोखंडी स्टॉपर लावण्याचा विसर कंत्राटदाराला पडला आहे. लोखंडी स्टॉपर स्थानकातील दर्शनी भागात पडल्याने याचा प्रवाशांना त्रास होतो ज्याचे दैनिक पुढारीने वृत्त देखील प्रसिद्ध केले होते. एसटी प्रशासन मात्र याची कोणतीही दखल घेण्यास तयार नसून प्रवाशांच्या समस्यांशी त्यांना काहीही देणंघेणं नाही अशी परिस्थिती आहे.
सिन्नर स्थानकात नुकताच बस थेट फलाटावर चढून भयंकर दुर्घटना घडली होती मात्र यातून वाडा आगाराने काहीही धडा घेतला नाही असेच बघायला मिळते. प्रवाशांची ही अडचण व धोका आगार व्यवस्थापक भूषण बेंद्रे यांना विचारणा केली असता विभागीय अधिकाऱ्यांकडे ते बोट दाखवितात. स्टॉपर हटवून स्थानकातील जागा तरी मोकळी करा असे सांगितले असता त्यासाठीही होणारा खर्च कोण देणार वरिष्ठ पातळीवर याबाबत कळविले असून विभागाकडून निधी आल्यावर कार्यवाही करू असे उत्तर त्यांनी दिले. ठाणे विभागाने तातडीने याबाबत दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.