

पाली ः शरद निकुंभ
राज्यातील अनेक जिल्ह्यांत नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून शेतकरी, ग्रामस्थ तसेच शाळकरी मुलांचेही जीव या हल्ल्यांत गेले आहेत. दरम्यान, कोकणातही बिबट्याचे धाडस वाढत असून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नागशेत व कोशिंबळे परिसरात त्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून दहशत निर्माण केली आहे. दाट जंगलाला लागून असलेल्या या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत बिबट्याने तिन जनावरांची हत्या केली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाची तातडीची धाव- घटना समजताच शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर लगेचच सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम, अनुभवी वनपाल उत्तम किसनराव शिंदे, वनरक्षक समाधान कुटे, पाच्छापूर वनरक्षक सायली महाडिक, पशुधन अधिकारी म्हसकर आणि नांदगाव विभागीय पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
डिसेंबर महिन्याच्या सुरवातीस बिबट्याने दोन दुभत्या गाई आणि एका वासराचा बळी घेतला. यापूर्वीही याच परिसरात म्हैस ठार मारल्याची घटना नोंदवली होती. हल्ल्याचे ठिकाणे जंगलाच्या कडेला असलेली गोठ्यांची वस्ती असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन आणि आवाज यामुळे ग्रामस्थ रात्रभर जागरण करीत आहेत.
भरपाईसाठी प्रस्ताव पाठविला
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तातडीने भरून निघावे म्हणून परिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांनी संबंधित कागदपत्रांसह भरपाईचा प्रस्ताव अलिबाग वनविभागाकडे पाठविला आहे. संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार लवकरच भरपाई मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांना आवाहन
वनविभागाने ग्रामस्थांना रात्री अनावश्यक घराबाहेर न पडणे, जनावरे सुरक्षित जागी बांधणे, जंगलाच्या कडेला एकटे जाणे टाळणे व काही हालचाल आढळल्यास त्वरित वनविभागाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.
गावकऱ्यांमध्ये पसरलेल्या भीतीचे गांभीर्य लक्षात घेऊनत्या परिसरात वनविभागाचे कर्मचारी नियमित गस्त घालत आहेत. जनावरांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी गुरांना बिल्ले (टॅग) लावावेत. सरकारी नियमांनुसार बिल्ला असलेल्या जनावरांवर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्यासच भरपाई मिळते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्वरित जनावरांना बिल्ले लावावेत, असे आवाहन वन विभागाने केले आहे.