

Dahanu Crime News
डहाणू : डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी (विवळवेढे) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त युवा सरपंच नितेश भोईर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. बुधवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास नितेश भोईर हे महालक्ष्मी - सोनाळे ते खाणीव या मार्गावर रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या मोटरसायकलसह आढळून आले. ही माहिती सकाळी कामावर जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाने त्यांच्या कुटुंबीयांना दिली.
त्यानंतर नितेश भोईर यांना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डहाणूतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथूनही प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गुजरातमधील वापी येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी सरपंच भोईर हे सापडले, तेथे लाकडी दांडक्याचे दोन तुकडे आढळले असून त्यावर रक्ताचे व केसांचे डाग आढळले आहेत. त्यामुळे हा अपघात नसून हेतुपरस्पर हल्ला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू असून या यात्रेदरम्यान जुगार व इतर बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे बोलले जात आहे. काही दुकानदारांनी ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखले घेतले नसल्याने सरपंच भोईर यांनी याला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असावा, असा आरोप त्यांच्या कुटुंबियानी केला आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिकच गंभीर ठरत आहे. डहाणूसारख्या ठिकाणी, आणि तेही एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम युवा सरपंचावर झालेला हल्ला, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. अपघात आणि घातपात या दोन्ही शक्यतांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.नितेश भोईर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि सत्य बाहेर यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.