

वाघोबा खिंडीत पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला आहे. पहाटेच्या सुमारास सिमेंट मिश्रित रेडिमिक्स काँक्रीटची खडी रस्त्यावर पडल्याने ट्रेलरचा ताबा सुटून तो पलटी झाला. या अपघातात ट्रेलरचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोईसर रस्त्यावरील वाघोबा खिंड हा अपघाताचा कायमस्वरूपी हॉटस्पॉट बनला आहे. या मार्गावरून एमआयडीसीमध्ये रेडिमिक्स काँक्रीट वाहून नेणाऱ्या बंकनर वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक माल भरला जातो. सतत सांडणाऱ्या सिमेंट मिश्रित खडीमुळे रस्ता घसरडा झाला आहे. नागरिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत तक्रारी केल्या, निवेदने दिली. परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
आज सकाळी झालेल्या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ट्रेलर बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. "दरवेळी अपघात झाल्यानंतरच प्रशासन हालचाल करते, यावेळी तरी कोणी जबाबदारी घेणार आहे का?" असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.
रोजच्या रोज होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी, अन्यथा आणखी एखाद्या निष्पापाचा जीव जाण्याची वाट पाहायची का, असा सवाल विचारला जात आहे.