बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांचा कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश निश्चित!

बविआच्या बॅनर वरून पाटील यांचा फोटो गायब!
Palghar News
राजीव पाटील यांचा कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेशPudhari Photo
Published on
Updated on

वसई : अनिलराज रोकडे

बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष, माजी महापौर, तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सख्खे आत्येभाऊ राजीव पाटील उर्फ नाना अगदी उद्याही किंवा कोणत्याही क्षणी भाजपात दाखल होणार असल्याच्या वृत्तास आज भक्कम पुष्टी मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आठवडाभर होत होती. अश्या चर्चा पाच वर्षांपूर्वीही झाल्या होत्या. यावेळी वसई विरार शहरात राजीव पाटील यांचे बहुजन विकास आघाडी पक्षाचे नाव वगळलेले, तथा त्यांच्या केवळ कामगार संघटनांची ओळख सांगणारे नवरात्रोत्सव शुभेच्छांचे फलक झळकळ्याने या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली होती. आज बहुजन विकास आघाडीच्या बॅनर वरील नेतेमंडळीतून राजीव पाटील यांचा फोटो हटविण्यात आल्यामुळे खुद्द बविआकडूनच त्यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे. दि. 14 ऑक्टोबर, रविवारी नालासोपारा पश्चिमेला खुल्या रंगमंचाच्या उद्घाटनाचा मोठा पक्षीय सोहळा होत असून, त्याचे आज सर्वत्र बॅनर लागले आहे. या बॅनरवर बविआ नेत्यांच्या पहिल्या आणि अगदी दुसऱ्या फळीतील नेत्यांचेही फोटो असून, मात्र त्यातून पाटील यांचा फोटो वगळलेला आहे. ही बाब पाटील यांचा ठाम निश्चय आणि बविआकडूनही परतीचे दोर कापल्याचा संकेत देणारी मानली जात आहे. अतिशय प्रतिकूल काळातून 35 वर्षांच्या संघर्षाचा लढा देत, विरारच्या ठाकूर साम्राज्याचा दबदबा राज्यात निर्माण करण्यात आणि राजकीय पक्ष म्हणून बविआचा विस्तार करण्यातही आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबरीने योगदान देणारे नेते म्हणून राजीव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे पालघर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून, ठाकूर व पाटील कुटुंबीयातील अखंडतेलाही तढा जाणार आहे.

Palghar News
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी किंगमेकर

राजीव पाटील यांची विधानसभा निवडणुक लढविण्याची खूप आधीपासून इच्छा होती. वसई विरारच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर राजीव पाटील हे दुसर्‍या क्रमांकाचे नेते मानले जातात. वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर, कामगार नेते वसईतील अग्रेसर बांधकाम व्यवसायीक म्हणून ते ओळखले जातात. पाटील यांचे संपूर्ण पालघर जिल्ह्यात आणि वसई विरार शहरातही स्वत:चे स्वतंत्र साम्राज्य आहे. २००९ मध्ये महापालिकेच्या स्थापनेनंतर त्यांना प्रथम महापौर पदाची संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांना कोणतेही मोठे पद मिळाले नाही. मात्र २०१४ मध्ये मतदारसंघाच्या पुर्नरचनेननंतर नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची इच्छा होती. परंतु आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देऊन जिंकवून आणले. क्षितीज ठाकूर २००९ पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता मात्र राजीव पाटील यांनी आमदारकी लढविण्याची तयारी केली आहे.

राजीव पाटील यांचे वय ६५ वर्ष आहे. ही संधी गेली तर पुढील ५ वर्षानंतर वयाच्या सत्तरीनंतर सर्वसाधारणपणे निवडणूक लढविण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी "अभी नही तो कभी नहीचा नारा" देत, आगामी विधानसभा निवडणूक लढवायचा ठाम निर्धार केला असल्याचे बोलले जात असून, त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निश्चय केला आहे. विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वगुण, संघटनकौशल्य आणि आर्थिक ताकद असे आवश्यक गुण राजीव पाटील यांच्याकडे असून, त्यामुळे त्यांनी आता आर या पारची तयारी केलेली आहे. माझी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मला पक्षाने तिकिट दिले तर मी निवडणूक लढवेन असे राजीव पाटील यांनी यापूर्वीही सांगितले होते. मात्र नालासापोरा आणि वसई हे दोनच खुले मतदार संघ असल्याने राजीव पाटील यांना बविआतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता कमीच होती.

Palghar News
वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याच्या तयारीत

राजीव पाटील यांनी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी भाजपातून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे आणि त्यांना तसे आश्वासन मिळाल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. नालासोपारा मतदारसंघातून ते इच्छुक आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांच्या बैठकाही संपन्न झाल्याचे समजते. याबाबत राजीव पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मला महाविकास आघाडी आणि महायुतीसह सर्वच पक्षांची ऑफर आहे. मात्र मी कुणालाही नकार दिलेला नाही अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीला शह द्यायचा असेल तर राजीव पाटील यांच्यासारख्या नेत्याची जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात आणि वसई विरार महापालिका निवडणुकीत मोठी मदत होऊ शकते, हेही भाजपा जाणून आहे. मात्र पाटील यांच्यासोबत आणखी कोण कोण नेते भाजपात जाणार? त्यांच्यात आणि भाजपात काय राजकीय तह किंवा तडजोडी झाल्या हे स्पष्ट व्हायला आणखी काही काळ जावा लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news