

Boisar Chilhar Bad Road Amol Garje Protest
बोईसर : पावसाळ्याची सुरुवात होताच बोईसर-चिल्हार रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल सुरु झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारी, आंदोलने आणि सोशल मीडियावरील पोस्टनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलली जात नाही.
याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल गरजे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नागझरी नाका परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांत त्यांनी बसून बादलीच्या सहाय्याने आंघोळ करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांचा रोष वाढू लागला आहे.
रस्त्यांच्या कामांमध्ये वारंवार भ्रष्टाचार केला जातो. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्ते काही दिवसांतच उखडतात. त्रास मात्र जनतेला आणि पैसा मात्र करदात्यांचा!” अशी टीका अमोल गरजे यांनी केली. तारापूर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी केवळ कागदोपत्रांवरच काम दाखवले जाते. म्हणूनच आज खड्ड्यांमध्ये बसून आम्हाला त्यांचे लक्ष वेधावे लागत आहेत.
दरम्यान, या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत, प्रवाशांना दिलासा द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करत आहेत.