

पालघर (निखिल मेस्त्री) : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानका नजीक ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेचा कोळंबा झाला ऐन कामावर सुटण्याच्या वेळेतच ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पालघर रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली. बांद्रा अजमेर एक्सप्रेस पालघर रेल्वे स्थानकाच्या क्रॉसिंग वरून जात असताना तिच्या पॅन्टग्राफ मध्ये ओव्हर हेड वायर अडकली व त्यानंतर गुजरातकडे जाणाऱ्या दोन्ही लाईनच्या ओव्हरहेड वायर नुकसानग्रस्त झाल्या. ही गाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या पुढे क्रॉसिंग वर थांबवण्यात आली.
ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या सह विरार डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. बांद्रा अजमेर एक्सप्रेस पालघर येथे उभी केल्याने तिच्या मागून येणाऱ्या सर्व गाड्या केळवे, सफाळे, विरार येथे थांबवण्यात आल्या आहेत. तर गुजरात कडून किंवा डहाणू कडून येणाऱ्या सर्व गाड्या डहाणू ते बोईसर दरम्यान थांबवण्यात आल्या.
काही महिन्यांपूर्वी पालघर रेल्वे स्थानकात रुळावरून मालगाडी घसरल्याने अनेक तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडल्याने किमान एक ते दोन तास रेल्वे सेवा ठप्प होणार असल्याचे रेल्वे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेचे ओव्हरहेड निरीक्षण यान तसेच अभियांत्रिकीसह तांत्रिक पथक पालघर रेल्वे स्थानकात दाखल झाले आहे.
वायर दुरुस्ती करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर स्थानिक पोलिसांसह लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून काही वेळेत ही सेवा पूर्ववत करण्यात येईल असे रेल्वे प्रबंधकांकडून प्रवाशांना सांगितले जात आहे.
दोन तीन तास तरी दुरुस्ती शक्य नसल्याने रेल्वे स्थानकावर असलेले रेल्वे प्रवाशांचे लोंढे प्रवासी वाहनांकडे वळत असून जे मिळेल ते वाहन करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लगबग करताना प्रवासी दिसून येत आहेत. पालघर रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. एसटी महामंडळामार्फत काही बसेस सोडण्यात येणार असल्याचे समजते.