

वाडा : वाडा तालुक्यातील विविध भागातून अवजड हायवा ट्रक दिवसरात्र येजा करीत असून यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट होऊ लागली आहे. धक्कादायक म्हणजे पिंजाळ व देहर्जे नदीवरील पूल धोकादायक असतानाही त्यावरून या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून प्रशासन निद्रिस्त अवस्थेत आहे. दैनिक पुढारीने देखील याबाबत सतत वृत्त प्रसिद्ध केले होते. प्रशासनाने अखेर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे बांधकाम विभागाला आदेश दिले असून या आदेशाची अंमलबजावणी होईल कशी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाडा ते मनोर महामार्गावरील पाली गावाजवळील पिंजाळ व करळगाव जवळील देहर्जे नदीवरील पूल तपासणी अहवालात कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही पुलांवरून 34 टन क्षमतेपेक्षा जास्त भारवहन करण्यासाठी बंदी असताना प्रत्यक्षात 60 ते 70 टन वजनाची वाहने त्यावरून जात असल्याचे दैनिक पुढारीने विविध वृत्तांमधून प्रसिद्ध केले होते. अखेर पुलांचा वाढता धोका लक्षात घेता पालघर अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत एका महिन्यासाठी अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
वाडा तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून महामार्गाची आधीच झालेली बिकट अवस्था अवजड वाहनांमुळे अधिक धोक्याची बनली आहे. रस्त्याची दुरुस्ती होत नसतांना होणारी अवजड वाहतूक पुलांना देखील धोक्याची बनली आहे. प्रशासनाचे आदेश बांधकाम विभाग किती गांभीर्याने घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून ही बंदी केवळ कागदावर नसावी अशी मागणी केली जात आहे.
असा असेल नवीन मार्ग :
मनोर - भिवंडी रस्त्यावरुन जेएनपीटी कडे जाणारी सर्व अवजड वाहने
मनोर- घोडबंदर- मार्गे जेएनपीटी तसेच भिवंडी- मनोर रस्त्यावर होणारी सर्व अवजड वाहतूक
ठाणे - घोडबंदर मार्गे मनोर व पुढे गुजरात बाजुकडे जातील.