

मच्छिंद्र आगिवले
वाडा : वाडा तालुक्यात जुन्या टायरवर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून जनता मेटाकुटीला आलेली आहे. लखमापूर गावाचा हद्दीतील सनराईज ग्रिन इंडस्ट्रीज या कंपनीत रविवारी रिॲक्टर स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. वाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून प्रदूषणासह कामगारांच्या जीवावर उठणाऱ्या या टायर कंपन्यांचा सरकारने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. अधिवेशनामध्ये अनेकदा या कंपन्यांवर कारवाईच्या घोषणा झाल्या आहेत मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने अजून किती बळी जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सनराईज ग्रिन इंडस्ट्रीज ही कंपनी जुन्या टायरवर प्रक्रिया करून त्यापासून तेल, काळी पावडर व लोखंड वेगळे करण्याचे काम करते. जवळपास 20 ते 22 कामगार या कंपनीत काम करीत असून रविवारी सकाळच्या सुमारास रिॲक्टर जवळ काम करीत असताना झालेल्या भीषण स्फोटात कामगार सुनिल मांझी, 28 वर्षे, रा. बिहार व गोलु बचन, 20 वर्षे, रा. उत्तरप्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणाऱ्या कामगारांपैकी दिनेश कुमार, 45 व अनिल पाशी, 31 हे दोघे जखमी झाले असून खुपरी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
कंपनी मालक उमेश पांडुरंग पाटील, 53 , रा. नेहरोली, ता. वाडा, ठेकेदार सेटु राजोवार, 30 वर्षे, रा. सेरपुर, पश्चिम बंगाल व मशीन ऑपरेटर अभिषेक श्रीराम माझी, 26 वर्षे, रा. चुडौली यांच्या विरोधात निष्काळजीपणे मृत्यू घडविणे असा ठपका ठेवून वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी घटना घडली असून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही असे वाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी सांगितले. याआधी तालुक्यातील वडवली गावाच्या हद्दीत असणाऱ्या एम. डी. पायरोलीसिस कंपनीत झालेल्या अशाच प्रकारच्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून अपघाताच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत.