

पालघर : नुकत्याच राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे मतदान झाले.या निवडणुकांमधील घडामोडी पाहता राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षात अनेक ठिकाणी बेबनाव झाल्याचे दिसून आले. मात्र बहुतांशी ठिकाणी भाजपने शिवसेनेला टाळून राष्ट्रवादी अजित पवार गटाशी सलगी केल्याचे दिसून आले.आणि शिवसेना शिंदे गटाला दाबण्याचा प्रयत्न झाला.
अशा आघाड्या आणि युत्या बऱ्याच ठिकाणी झालेल्या असताना पालघर जिल्ह्यात मात्र भाजपाने चारही जागावर एकला चलो रे चा नारा देत स्वबळावर या निवडणुका लढविल्या तर दुसरीकडे मात्र भाजप विरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्याचे काही ठिकाणी दिसून आले तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तर काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या एक विचित्रच आघाड्या झाल्याचे दिसून आले.
या सर्व खिचडीमध्ये मात्र जिल्ह्यातील भाजपने आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवत या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आणि त्या ताकतीने लढवल्या सुद्धा यामुळे भाजपचा हाच एकला चलो रे चा नारा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये देखील कायम राहणार असल्याचे एकूणच राजकीय चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे तर दुसरीकडे शतप्रतिशत भाजपचा जो नारा आहे तो पालघर जिल्ह्यात मात्र खरा होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदरच भाजप आणि शिवसेना शिंदे गटात एकमेकावर आग पाखड होताना दिसत होती. याचीच प्रचिती निवडणुकीत आणि मतदानापर्यंतच्या सर्व प्रक्रियेत दिसून आली मात्र एकीकडे राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची सलगी होताना दिसत असली तरी पालघर जिल्ह्यात मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची जवळीक झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील या निवडणुकातील राजकीय परिस्थिती पाहता पालघर नगर परिषदेमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढली तर शिवसेना शिंदे गट सुद्धा स्वतंत्रपणे लढण्याची दिसून आले तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रितपणे निवडणूक लढले तर दुसरीकडे काँग्रेस आणि अजित पवार गट एकत्रित लढल्याने पालघर मध्ये ही नवीनच आघाडी पाहावयास मिळाली अनुक्रमे डहाणू नगरपरिषदेत तर भाजप स्वतंत्र लढली तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे चारही पक्ष एकत्रित येऊन त्यांनी भाजपला मोठे आव्हान दिले. तर वाडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा भाजप स्वबळावर लढली.
या ठिकाणी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची महाविकास आघाडी शेवटपर्यंत न झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी कोणालाही पाठिंबा जाहीर न केल्याने या ठिकाणी मोठी अडचण निर्माण झाली तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित आल्याचे पहावयास मिळाले तर जव्हार मध्ये सुद्धा भाजप स्वबळावर लढली आणि शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रित तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रित लढले या सगळ्यांमध्ये एक मात्र स्पष्ट झालं की संपूर्ण जिल्ह्यातील चारही निवडणुकात भाजप ही स्वतंत्रपणे लढली आणि शतप्रतिशत भाजपचा जो नारा दिला जातो. त्याच्या पूर्णत्वाकडे या जिल्ह्यात भाजप चालल्याचे यावरून दिसून येत आहे.
आता कोणत्याही क्षणी राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे पालघर जिल्हा परिषदेत एकूण 57 सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे तर आठ तालुक्यांमध्ये पंचायत समितीसाठी ही निवडणूक होणार आहे यामुळे नुकत्याच झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांचा अंदाज घेता भाजप जिल्हा परिषदेच्या निवडणुकात सुद्धा स्वबळावर लढेल असे खात्रीशीर चित्र या जिल्ह्यात दिसून येत आहे. कारण की या ठिकाणी महायुतीतील महत्त्वाची पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये विस्तव जात नाही या पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद कमी असल्याने त्यांना भाजपकडून विचारात घेत नसल्याने प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराजी व्यक्त करून स्वबळाचा नारा देतात.
यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीतील सुद्धा सर्वच पक्ष स्वबळावर लढतील अशी चिन्ह आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी होण्याची मात्र दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यात जरी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सख्य असले तरी जिल्ह्यात मात्र भाजप स्वतंत्रपणे वाटचाल करत असला तरी भाजप विरोधी सर्वच पक्षांची मोठही बांधली जाण्याची शक्यता आत्ताच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे .