

सफाळे : तब्बल वीस वर्षे अखंड सेवेनंतर जिल्हा परिषद शाळा बोरीचा पाडा येथील आदरणीय शिक्षक मोहन लाखात यांची प्रशासकीय बदली झाल्याने संपूर्ण गाव भावुक झाले. या निमित्ताने त्यांच्या निरोपार्थ भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सोमवार, 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता सरांच्या परिवारासह विद्यार्थ्यांनी गावभर भव्य मिरवणूक काढली. प्रत्येक घरातून त्यांचे औक्षण होत होते. गावकर्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. संपूर्ण वातावरणात दुःख आणि अभिमानाची एकत्र छटा दिसत होती.
यानंतर शाळेत झालेल्या सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बारक्या लिलका तर विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख पारगाव प्रभाकर भोईसर, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून लाखात सरांच्या कार्याचा गौरव केला. वस्तीशाळेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळा 8 वीपर्यंत नेण्यापर्यंत पोहोचला, हे सांगताना सर स्वतः भावूक झाले. शाळेविषयीचे त्यांचे प्रेम, विद्यार्थ्यांविषयीची तळमळ त्यांच्या शब्दांतून प्रकर्षाने जाणवत होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन गरुड यांनी केले. सूत्रसंचालन हर्षला पागी यांनी केले तर आभारप्रदर्शन पूनम कराळे यांनी केले. संपूर्ण गाव भावनाविवश होत सरांना निरोप देत असताना, त्यांचे जीवनकार्य आणि योगदान गावकर्यांच्या हृदयात कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली.