

खानिवडे: वसईतील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव नेमक्या पोटरी काळात जाणवू लागला असल्याने शेतकर्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.यासाठी कृषी विभागाने पाहणी करून योग्य मार्गदर्शन आणि उपाय योजनांची माहिती द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यंदा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून मागे आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत होता. भात रोपाची लागवड केलेल्या दिवसांपासून पाऊस सुरूच राहिल्याने भात पिकावर बगळ्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. या संकटामुळे भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भातपिकाचे उत्पादन घेतले जात असून भात हेच जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीत लागवड केलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुका कृषी विभागाने शेतक-यांना मदतीच्या दृष्टिकोनातून गावा- गावातील बाधित शेतकर्यांची तात्काळ माहिती घेऊन त्यांना औषध फवारणीसाठी योग्य मार्गदर्शन व मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषी विभागातर्फे दिलेल्या पृथ्वीराज पाटील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माहितीनुसार यंदा सतत पाऊस सुरू असून ज्यावेळी पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण राहिले आहे.
यामुळे काही ठिकाणी बग्या आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.मात्र अश्या वेळी शेतकर्यांनी घाबरून न जाता वेळीच उपाय योजना करावी.यासाठी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 80% डब्ल्यु. पी. 25 ग्रॅम अधिक 0.5 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने त्याची फवारणी करावी.याहून अधिक उपाय योजना माहिती हवी असल्यास आपल्या जवळच्या सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.