

कासा : निलेश कासट
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या स्पोर्ट्स मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून भरधाव वेग, स्टंटबाजी आणि रोडरोमिओगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लग्नसराईच्या काळात संध्याकाळच्या वेळेस गावागावांतून वेगाने मोटारसायकली चालवण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, बाजारपेठा तसेच लग्न समारंभांच्या ठिकाणी काही तरुणांकडून फिल्मी स्टाईलने मोटारसायकल चालवणे, गर्दीच्या ठिकाणी स्टंट करणे, चालत्या गाडीवर सिगारेट ओढणे, हेल्मेटचा वापर टाळणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. अनेक दुचाकींना बदल केलेले सायलेन्सर बसवून कर्कश आवाजात गाड्या चालवल्या जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे काही तरुणांकडून मोटारगाड्यांच्या दोन्ही बाजूंच्या काचा काढून नियमबाह्य पद्धतीने वाहन चालवले जात असल्याचेही दिसून येत आहे. लग्न समारंभांमध्ये स्पोर्ट्स बाईकवरून भरधाव फेऱ्या मारणे, रस्त्यावर अचानक स्टंट करणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा या भरधाव वाहनांमुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नाही आणि गंभीर अपघात घडतात. काही प्रकरणांमध्ये तर पादचारी आणि सामान्य नागरिकांनाही नाहक जीव गमवावा लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी
ग्रामीण भागात वाढत्या रोडरोमिओगिरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. नियमित नाकाबंदी, हेल्मेट तपासणी, बदल केलेल्या सायलेन्सरवर कारवाई तसेच अल्पवयीन वाहनचालकांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या मुलांच्या पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मुलांना महागड्या आणि वेगवान बाईक देताना वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालकता आणि सामाजिक जबाबदारी यांचे भान देणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय दबावामुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह
काही वेळा पोलिसांकडून कारवाई सुरू असताना संबंधित तरुणांना वाचवण्यासाठी काही राजकीय किंवा सामाजिक पदाधिकारी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, अशीही चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी निष्पक्ष कारवाई करावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.