Kolhapur Accident: सायबर चौकात 7 वाहनांचा विचित्र अपघात; 5 जखमी

सुदैवाने जीवितहानी टळली; एअरबॅगमुळे मोटारचालक बचावला
Kolhapur Accident
Kolhapur Accident: सायबर चौकात 7 वाहनांचा विचित्र अपघात; 5 जखमीPudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या मध्यवर्ती सायबर चौकात बेक निकामी झालेल्या आणि ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने मंगळवारी रात्री जीवघेणा थरार घडविला. सिग्नलला थांबलेल्या तीन आलिशान मोटारी, मालवाहतूक टेम्पो आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारी मिनी लक्झरी व अन्य दोन वाहने अशा सात वाहनांना जोराची धडक दिली. या धडकेत मोटारींचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण दुर्घटनेत ट्रक, मोटार, टेम्पो चालकासह पाचजण जखमी झाले.

गर्दीने गजबजलेल्या सायबर चौकात अपघात झाल्याने एकच गोंधळ उडाला. उशिरापर्यंत येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री उशिरा अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अपघातात ट्रकचालक प्रदीप महादेव सुतार (37, रा. पट्टणकुडी, ता. निपाणी, जि. बेळगाव), टेम्पो चालक अभिषेक शिवाजीराव माळी (27, रा. गडमुडशिंगी), मोटारचालक सुनील रेडेकर (50, रा. मोहिते कॉलनी,तपोवन मैदान, कोल्हापूर), दिलीप पटेल (50, रा. साईक्स एक्सटेंशन, टाकाळा) जखमी झाले. रात्री उशिरा ट्रकचालक प्रदीप सुतारला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंगळवारी रात्री सायंकाळच्या सुमारास शाहू टोल नाक्याकडून भरधाव वेगाने आलेला उसाने भरलेला ट्रक सायबर चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता. राजाराम कॉलेजपासून घसरतीला आल्यावर या ट्रकचा बेक फेल झाला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला. सायंकाळी साडेसातची वेळ असल्याने या रस्त्यावर मोठी गर्दी होती. सायबर चौकातील सिग्नल सुरू होता. सिग्नलवर शेकडो दुचाकी वाहने आणि चारचाकी वाहने सिग्नल सुटण्याची वाट पाहात असतानाच राजाराम कॉलेजकडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने सायबर चौकात सिग्नलला थांबलेल्या सुनील रेडेकर यांच्या आलिशान मोटारीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे या मोटारीचा चक्काचूर होऊन ही मोटार ट्रकच्या चाकाखाली गेली. त्यानंतर एकापाठोपाठ अशा सहा वाहनांना ट्रकने जोराची धडक दिली. त्यानंतर हा ट्रक रस्ते दुभाजकांवर जाऊन आदळला. एकापाठोपाठ एक वाहनांना ट्रक धडक देत सुटल्याने सायबर चौकात एकच घबराट पसरली. अपघाताचा मोठा आवाज झाला.

चौकामध्ये नागरिकांची जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली. अनेकांना नेमके काय झाले आहे हेच समजेना. अपघातग््रास्त पाच मोटारीत, मिनी बसमध्ये अडकलेल्या चालकांना तसेच वाचविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिकांना बोलवून जखमींना रुग्णालयात हलविले. ट्रकने जोरात धडक दिल्याने पाचही मोटारींचा चक्काचूर झाला होता. अपघातग्रस्त वाहनांचे स्पेअर पार्ट रस्त्यावर विखुरले होते. यामुळे राजाराम महाविद्यालयाकडून सायबर चौकाकडे आलेल्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. परिसरातील नागरिकांची अपघातस्थळी मोठी गर्दी झाली.

अपघातातील जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, अग्निशमन दलाचे जवानासह या परिसरातील संयुक्त सायबर चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे नितीन पाटील, सुभाष संकपाळ, नितीन मोरे, महेश कोरवी, सुखदेव बुद्ध्याळकर, आनंदा कुटाळे किरण भोसले, सुहास पाटील, समीर धनवडे तसेच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग््रास आदींनी प्रयत्न केले.

घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी

ट्रकने ठोकरल्याने कारखानदार दिलीप पटेल, टेम्पो चालक अभिषेक माळी यांच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचे दृश्य पाहून त्यांना अपघाताची भीषणता लक्षात आली. परंतु सुदैवाने आपले नातेवाईक या अपघातातून सुखरूप बचावल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सायबर चौक की मृत्यूचा सापळा?

2 जून 2024 रोजी सायबर चौकात दुपारी दोनच्या सुमारास शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांच्या मोटारीने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी रात्री घडलेल्या जीवघेण्या अपघातामुळे पुन्हा त्या अपघाताची आठवण झाली. त्यामुळे सायबर चौक हा आता अपघातासाठी ब्लॅक स्पॉट बनत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

एअरबॅगने वाचविला जीव

ट्रकने जोरदार धडक दिल्याने चक्काचूर झालेल्या मोटारीतील एअर बॅग खुली झाली. त्या बॅगमुळे सुनील रेडेकर या चालकाचा जीव वाचला. त्यांच्या हाताला इजा झाली. भेदरलेल्या अवस्थेत अपघातस्थळापासून काही अंतरावर ते उभे होते. या अपघाताची माहिती रेडेकर कुटुंबीयांनाही मिळाली. ते धावतच सायबर चौकात आले. मोटारीचे दृश्य पाहून रेडेकर यांच्या कुटुंबीयाना अश्रू अनावर झाले. त्यांनी सुनील रेडेकर यांची भेट घेऊन पाहणी केल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news