

Wani Nanduri Road Accident
वणी : वणी–नांदुरी कळवण मार्गावरील पायरपाडा येथे मंगळवारी (दि. २८) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव अज्ञात मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत प्रकाश दौलत भरसट (वय ४५, रा. पायरपाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप उसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरसट हे सायंकाळी पायी गावाकडे जात असताना मागून आलेल्या वेगवान वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित चालकाने थांबून मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप अधिकच वाढला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व किरण जगदाळे यांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चालक फरार झाल्याने संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको आंदोलन छेडले.
विठ्ठल भरसट, अमोल पवार, सुकदेव बहिरम, साईनाथ बागूल, प्रकाश गायकवाड, सुरेश चौधरी, माधव चौधरी, काळू पवार, धनराज चौधरी आदींसह सुमारे १५० ते २०० ग्रामस्थांनी रस्ता अडवून निषेध व्यक्त केला. “अपघातातील चालकाला तात्काळ अटक करावी आणि या मार्गावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी गतीरोधक बसवावेत,” अशी मागणी आंदोलकांनी केली. यापूर्वीही या ठिकाणी उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात आला.
या आंदोलनामुळे वणी–नांदुरी कळवण मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, स्थानिक मान्यवर, ग्रामस्थ व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलकांशी चर्चा करण्यात आली. पोलिसांनी आरोपी वाहनाचा लवकर शोध घेऊन कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अभोणा व कळवण येथील पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
प्रकाश भरसट हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व सुना असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्याने भरसट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वणी–नांदुरी कळवण मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी वळणावर रस्ता खोलगट असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.