

तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सप्तमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. रविवारी हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. आई राजा उदो... उदो सदानंदीच्या उदो उदो... या जय घोषामध्ये भाविकांनी दर्शन घेतले. , , ,
दरम्यान सातव्या दिवशीही पाऊस झाल्याने भाविकांचे हाल झाले. मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीची पूजा झाली. यावेळी रात्री अकरा वाजेपासून दर्शन रांगांमध्ये प्रतीक्षेत असणाऱ्या भाविकांचे दर्शन सुरू झाले. पावसाचे वातावरण असल्यामुळे भाविकांना थंडीचा त्रास सहन करावा लागला वयोवृद्ध आणि लहान मुलांना या दरम्यान मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. निवाऱ्याची कमतरता असल्यामुळे तुळजापुरात भाविकांच्या अडचणी यावर्षीच्या नवरात्र महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यांना थांबण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेक भाविकांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली.
दुपारी अकरा वाजता देवीसमोर शेषशायी अलंकार महापूजा तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील भोपे पुजारी सचिन परमेश्वर आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली. आरती आणि अंगारा बारा वाजता झाला. देवीच्या भोवती मोठ्या आकाराचा शेष वेटोळा देऊन बसलेला दाखविण्यात आला होता. डोक्यावर चांदीचा फणा आणि हातामध्ये शस्त्र होती.