

Mahurgad Renuka Devi: Renuka Devi is a reflection of Mahurgad tradition.
अविनाश घोगरे
घनसावंगी : माहूरगड हे रेणुका मातेसाठी प्रसिद्ध शक्तिपीठ. पण त्याच परंपरेचे प्रतिबिंब म्हणून जवळच्या साडेगावात वसलेले रेणुका देवी मंदिर आजही भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. तीर्थपुरीपासून केवळ नऊ किलोमीटर अंतरावर, गोदावरी नदीच्या काठी असलेले हे मंदिर प्रसिद्धीपासून दूर असले तरी त्याचा धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा अत्यंत समृद्ध आहे.
वंशपरंपरागत अर्चक अनिल जोशी सांगतात की, हे मंदिर निजाम राजवटीपासून अस्तित्वात आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडच्या रेणुका देवीचे प्रतिरूप या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळेच या देवस्थानाला विशेष पावित्र्य लाभलेले आहे. मंदिराचे बांधकाम पारंपरिक लाकडी माळवद पद्धतीने झाले आहे. गाभाऱ्यातील सागवानी लाकडावरील कोरीव नक्षीकाम सुबक आणि आकर्षक आहे. गाभाऱ्यात रेणुका देवीचा तांदळा आहे. त्याभोवती देवीचे अलंकार, धातूची भांडी, कवड्याच्या माळा, परड्या आणि गोफ यांनी केलेली सजावट मंदिराच्या प्राचीनतेची आणि भक्तिभावाची साक्ष देते.
पूर्वीच्या भक्तांनी या मंदिराच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी इनामी जमिनी दान दिल्या आहेत. त्या जमिनीवरील उत्पन्न आणि भाविकांच्या उदंड मदतीतून दैनंदिन पूजाअर्चा, उत्सव आणि मंदिराची देखभाल आजही व्यवस्थित चालते.
या मंदिराची खरी ओळख म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव. या काळात संपूर्ण साडेगाव एकत्र येतो. रोज सकाळी देवीची पूजा, दुपारी अर्चना, रात्री सामूहिक आरती, तसेच यज्ञ-होम यांसारखे धार्मिक कार्यक्रम होतात. स्त्री-पुरुष, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या उत्सवात सामील होतात. नवरात्रातील हा दहा दिवसांचा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता गावाच्या सांस्कृतिक ऐक्याचा आणि भक्तीभावाचा प्रतीक ठरतो.
साडेगाव व परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. साडेगाव व परिसरातुन येणारे भक्त येथे दर्शन घेऊन समाधान व आशीर्वाद अनुभवतात.
ऐक्य टिकून
देवीभक्त सुभाष देशमुख सांगतात की, रेणुका देवी ही आमच्या साडेगावची आत्मा आहे. नवरात्रात संपूर्ण गाव देवीच्या सेवेसाठी वाहून घेतो. पूजा, आरत्या, प्रसाद वितरण -प्रत्येक कार्यात गावातील प्रत्येक जण सहभागी असतो. या देवीच्या कृपेने गावात सदैव शांतता आणि ऐक्य टिकून आहे, हीच आमच्यासाठी खरी संपत्ती आहे.