Palghar Rice Farming: भातपिके सुकू लागली अन् शेतकऱ्यांची चिंता वाढली! कवडास धरणातून ५० क्युसेक पाणी सोडले

कवडास, सुर्या कालव्यांचे पाणी भातशेतीसाठी सोडले
Palghar Rice Farming
Palghar Rice FarmingPudhari
Published on: 
Updated on: 

पालघर: पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भातशेतीवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. पावसाअभावी अनेक ठिकाणी भाताची हळवी व निम गरवी उभी भात पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत होते.

पिकाची सद्यस्थिती व शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती पाहता रविवारी सकाळी डावा व उजव्या कालव्यातून ५० क्यूसेक कवडास धरणातून सोडण्यात आले आहे.यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

पावसाने दडी मारल्याने उभे भातपीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र गावित यांच्यासमोर व्यक्त केली होती. त्यानूसार पाठपुराव्याअंती सुर्या प्रकल्पअंतर्गत डाव्या व उजव्या कालव्याअंतर्गत येणाऱ्या तवा, पेठ, चारोटी, कासा, वाघाडी, उर्से, साये सारणी, आंबिवली, रानशेत, साखरे तसेच नानिवली, आंबेदा, सोमटा, रावते, सुमारे शेकडो गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सद्य स्थिती लक्षात घेत सूर्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून कालवा बाधित गावांमधील भातशेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पावसाअभावी सुकत चाललेल्या भात पिक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Palghar Rice Farming
Thane Tembhi Naka Traffic Diversion: नवरात्रौत्सवानिमित्त ठाण्यात वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते?

पावसाच्या अनिश्चिततेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या या तातडीच्या प्रयत्नामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान पावसाने सलग तीन आठवड्यांची विश्रांती घेतल्याने शेतातील ओलावा कमी झाला असून, भात पीक करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत असून, अतिरिक्त खर्च करून भात शेती जगवण्याची धडपड सुरू आहे.

येत्या 48 तासात राज्यातून मान्सून माघारी फिरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.पाऊस होण्याची शक्यता नसल्याने भात पीक करपण्याची शक्यता निर्माण झाल्याने भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पालघर तालुक्यातील कुडे गावातील शेतकरी विकास पाटील यांनी आपल्या चार हेक्टर क्षेत्रातील भात पीक वाचवण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पाणी आणून शेतात सोडले आहे. पावसाअभावी भाताच्या लोंब्यांमध्ये दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांनी हा उपाय केला आहे.

Palghar Rice Farming
Palghar|महामार्गावर चालत्या दुचाकीने घेतला पेट; ज्वाळांनी दुचाकी खाक

ज्या ठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध आहे, त्या ठिकाणाहून पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपांच्या साहाय्याने पाणी शेतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे. मात्र टँकर, इंधन आणि पंपासाठी होणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पालघर जिल्ह्यात सुमारे ७८ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेवटच्या टप्प्यात पावसाने मोठा खंड दिला आहे. त्यामुळे सुरुवातीला समाधानकारक वाटणारी भात शेती आता अनियमित पावसामुळे संकटात सापडली आहे.

दाणा भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मान्सूनने राज्यातून माघार घेण्यास सुरुवाती केल्याने उर्वरित काळात पावसाची शक्यत नाही. पाण्याअभावी पीके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनाने पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे. दरम्यान सुर्यातून सोडलेल्या पाण्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. तसेच पुढे जावून शेतीची परिस्थीती अधिक गंभीर होवू नये म्हणून शासनाकडून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.

नुकसान भरपाईची मागणी

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेती, घरे, फळबागा आणि शेतीशी संबंधित मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यातच ३० सप्टेंबर रोजी झालेल्या वादळामुळे अनेक भागांतील घरांचे नुकसान झाले असून आंब्याच्या बागांसह विविध पिकांनाही फटका बसला आहे. या संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

विहीर किंवा बोअरवेलची सुविधा असलेले शेतकरी स्वतःच्या खर्चाने पाणी देत आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हा अतिरिक्त खर्च मोठा भार ठरत आहे. दरम्यान, भात पिकाचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई व पीकविमा लाभ मिळवून द्यावा. तसेच ३० सप्टेंबरच्या वादळामुळे बाधित शेतकरी आणि फळबागायतदारांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news