

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या सरी बुधवारीही कायम राहिल्या. जोरदार पावसासह वेगवान वारे वाहत असल्याने झाडांची पडझड सुरूच राहिली. बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर झाडे व दरडी कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले.
अनेक ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचेही नुकसान झाले. पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी मान्सूनच्या सुरुवातीची आक्रमकता आणि वादळी वारे यंदा तुलनेने कमी आहेत. तरीही ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून जाणे, बागायती झाडांचे नुकसान होणे, झाडे कोसळणे अशा घटना घडल्या.
या पावसामुळे मोसमी पावसाची तूट कमी होण्यास मदत झाली असून दिवसभरातील राज्याचा सरासरी पाऊस ८९.५ मिमी नोंदविण्यात आला. १ जून ते २३ जून या कालावधीत गोव्यात ६७०.७मिमीच्या सरासरीच्या तुलनेत २७८.६ मिमी पाऊस झाला असून राज्यात ५८.५ टक्के मोसमी तुटीची नोंद झाली आहे.
सोमवारपर्यंत ही तूट ७०.५ टक्के होती. ताज्या पावसामुळे केवळ २४ तासांत तूट १२ टक्क्यांनी कमी झाली असून संथ सुरुवातीनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी गोव्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. उत्तर गोव्यात सामान्य २७.७ मिमीच्या तुलनेत ८७.४ मिमी पाऊस झाला, जो २१६ टक्के अधिक आहे;
तर दक्षिण गोव्यात सामान्य ३०.७ मिमीच्या तुलनेत ९१.३ मिमी पावसाची नोंद झाली, जो १९८ टक्के अधिक आहे. त्या दिवसाची राज्याची सरासरी पर्जन्यमान ८९.५ मिमी होती, जी सामान्यपेक्षा २०६ टक्के अधिक आहे. भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळांतील आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पणजी येथे ३९.८ मिमी, तर मुरगाव येथे ३३.६ मिमी पावसाची नोंद झाली.