

कासा : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि.3) रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. मात्र, पाऊस कमी असो किंवा जास्त, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे हे जणू ग्रामीण भागातील नित्याचेच चित्र बनले आहे.
पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून काही ठिकाणी विजेच्या तारांलगत असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तरी अनेक दुर्गम व ग्रामीण भागांत विजेच्या तारा लोंबकळणे, जीर्ण खांब, तारांवर वाढलेली झाडे-वेली तसेच रोहित्रांच्या देखभाल-दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.
डहाणू तालुक्यातील चारोटी वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या धामटणे गावातील दुकानपाडा परिसरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे विजेच्या तारेवर एक मोठे झाड कोसळले. या घटनेत दोन विजेचे खांबही जमीनदोस्त झाले. परिणामी बालशीपाडा, पाटीलपाडा, मुरबीपाडा तसेच गावातील इतर वाड्या-वस्त्यांमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सलग दोन दिवस अंधारात रात्र काढावी लागत आहे.
दरम्यान, विजेच्या तारांवर कोसळलेले झाड हटविण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता गावातील होतकरू तरुणांनी पुढाकार घेत एकत्रितपणे झाड तोडून बाजूला केले. मात्र, पडलेले विजेचे खांब आणि नुकसान झालेल्या तारांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
"आम्ही नियमितपणे वीजबिल भरतो, मात्र पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे ही नेहमीचीच बाब झाली आहे. विजेच्या तारांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेत झाड हटविले, परंतु खांब आणि तारांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अंधारात रात्र काढावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा," अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बालशी यांनी 'पुढारी'शी बोलताना केली.
या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तात्काळ उपाययोजना करून धामटणे परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.