

Sambhajinagar Rain: Heavy rainfall in the city – over 39 mm recorded
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरासह परिसराला बुधवारी (दि.१) मुसाळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. ३६ मिमीपेक्षा अधिक पाऊस बरसला, या पावसाने शहरातील नागरी व्यवस्थेचे वास्तवही समोर आणले असून, खा. संदीपान भुमरे यांच्या सूतगिरणी चौकातील निवासस्थाच्या तळघरात पावसाचे पाणी साचण्यासह शहरातील प्रमुख रस्ते, चौक, वसाहती आणि सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.
महापालिकेने कोटडवधी रुपये खर्च करून नालेसफाई केल्याचा दावा केला असला तरी पहिल्याच जोरदार पावसात त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर मनपा मुख्यालयाचा तळमजलाही पावसाच्या पाण्याने तुंबला. या ठिकाणी पाणी निचऱ्याची व्यवस्थाच नसल्याने गुडघाभर पाणी साचले. या ठिकणच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील वीज पुरवठा नियंत्रण कक्षात पाणी शिरल्याने काही काळ केबिन बंद ठेवावी लागली.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसात तूट राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता होती. अशा परिस्थितीत बुधवारी सकाळपासून काळे ढग जमा झाले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि सुमारे चार वाजेपर्यंत संततधार सुरूच होती. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत सरी अधून मधून कोसळत होत्या. या पावसाने महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व तयारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले.
महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यातच पाणी शिरल्याने प्रशासनाचीच गैरसोय झाली. तसेच शहरातील अनेक सोसायट्या, वसाहती आणि घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांना घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी धावपळ करावी लागली. गारखेडा परिसरातील विजयनगर येथील जय दुर्गा सोसायटीच्या तळघरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. न्यू हनुमाननगरातील अष्टविनायक मंदिराजवळील एका घरात पावसाचे पाणी घुसले.
उल्कानगरातील अगस्त होमसमोरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. तसेच सिडको एन-३ परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या तळघरातही पाणी शिरले. या दमदार पावसाने शहरातील पावसाळापूर्व नियोजनातील त्रुटीही उघड केल्या. नालेसफाई, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सखल भागांतील उपाययोजनांबाबत महापालिकेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अग्निशमन दलाची धावपळ
खा. संदीपान भुमरे यांच्या सूतगिरणी चौकातील निवासस्थाच्या तळाघरात पावसाचे पाणी तुंबले. यासह टीव्हीसेंटर येथील ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात पाणी शिरले. तर गणेशनगर, परिजातनगर येथील घरांमध्ये पाणी साचले. हसूल, पिसादेवी रोडवरील घरांमध्ये पाणी शिरले. याशिवाय गारखेडा भागातील जय दुर्गा सोसायटी, न्यू हनुमाननगरातील अष्टविनायक मंदिर परिसर, उल्कानगरीतील मार्ग पावसाच्या पाण्याने तुंबला तर सिडको एन-३ येथील एका रुग्णालयाच्या तळघरामध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोटारपंपांच्या सहाय्याने पाणी उपसून नागरिकांना दिलासा दिला.
धुवांधार पाऊस
शहरावर सकाळपासूनच पावसाचे ढग जमा झाले होते. दरम्यान, दुपारी दोन ते चार या कालावधीत शहरात ३६ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला होता.
महापालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोल
पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील नालेसफाई केल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र पहिल्याच मुसळधार पावसात नाले तुंबल्याने अनेक वसाहती, सोसायट्या आणि महापालिका मुख्यालयातच पाणी शिरले. त्यामुळे नालेसफाईच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापालिका मुख्यालयातील वीज पुरवठा नियंत्रण कक्षात पाणीच पाणी
शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या मुख्यालयातील वाहनतळ जलमय झाला. यात मुख्य प्रवेशद्वाराजवळील वीज पुरवठा नियंत्रण कक्षात पाणी शिरल्याने काही काळ केबिन बंद ठेवावी लागली. या कक्षातून संपूर्ण मुख्यालयाला वीज पुरवठा होत असल्याने संभाव्य विद्युत दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पावसाळ्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी नियंत्रण कक्षाची सुरक्षितता वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
समर्थनगरात झाड कोसळले
समर्थनगर परिसरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या मागे मुसळधार पावसामुळे एक मोठे झाड कोसळले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ परिसरात नागरिकांची ये-जा आणि वाहतूक ठप्प झाली होती.