

कासा : डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या 21 वर्षीय तरुणीवर हवालदाराने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हवालदार शरद भोगाडे (41) याला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांची तात्काळ बदली केली आहे.
तक्रारीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी एका विवाहित महिलेनं पतीने तिला सोडून दुसऱ्या तरुणीसोबत राहायला गेल्याची नोंद कासा पोलिसांकडे केली होती. या तक्रारीच्या चौकशीदरम्यान हवालदार भोगाडे यांनी संबंधित 21 वर्षीय तरुणीला अनेक वेळा पोलीस ठाण्यात बोलावले. वारंवार चौकशीच्या बहाण्याने भोगाडे यांनी तरुणीशी जवळीक साधत तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.यानंतर 29 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावून भोगाडे यांनी तरुणीचा विश्वास संपादन केला आणि पोलिस ठाण्याच्या मागील वसाहतीतील खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली. अखेर 7 डिसेंबर रोजी तरुणीने धैर्य दाखवत डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. डहाणू पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी प्रकरण कासा पोलिसांकडे वर्ग केले असून त्याच रात्री 11 वाजता आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणामुळे पोलिस विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातीलच कर्मचारी अशा कृत्यात सामील होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीवर कठोरातून कठोर कारवाई करावी, तसेच पोलीस ठाण्यांमधील आंतरर्गत देखरेख अधिक मजबूत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.