

आशिष शिंदे
कोल्हापूर : घरगुती व सामाजिक वातावरणातील ताणतणाव, इंटरनेटचा वाढता वापर आणि आर्थिक-सामाजिक असमानतेमुळे राज्यात बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यात दररोज 8 चिमुकल्यांवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. तर 51 अपहरणाचे गुन्हे उघडकीस येत आहेत. राज्य शासनाच्या अहवालानुसार बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत 21.2 टक्क्यांनी वाढले असून, 2023 मध्ये 21,802 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
राज्यात बालकांवरील अत्याचार वाढण्यामागे घरगुती ताणतणाव, आर्थिक-अस्थिरता आणि कुटुंबातील व्यसनाधीनता यांसारखी सामाजिक कारणे प्रमुख आहेत. इंटरनेट व सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर, ऑनलाईन ग््रूामिंग आणि पॉर्नोग््रााफीचा सहज प्रवेश यामुळेही मुलांचे शोषण व अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. स्थलांतर, शहरीकरण आणि दाट वस्त्यांतील निगराणी अभावामुळे मुलांवर नियंत्रण कमी झाले असून शाळा, महाविद्यालये आणि वाहतूक व्यवस्थेत बालसुरक्षेची अपुरी अंमलबजावणी देखील धोकादायक ठरत आहे. तक्रारी नोंदविण्याची मानसिकता आणि पोस्कोबाबत जागरूकता वाढल्याने आधी नोंद न होणारे गुन्हे आता आकडेवारीत अधिक दिसू लागले आहेत. तसेच रस्त्यावरची व कष्टकरी कुटुंबांतील मुले अधिक असुरक्षित असल्याने त्यांच्यावर अत्याचाराचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अपहरण, बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे : सर्वाधिक वाढ ही बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांत दिसून येते. 2021 मध्ये 2,319 असलेली बलात्कार प्रकरणांची संख्या 2023 मध्ये 2,811 वर पोहोचून तब्बल 21 टक्क्यांनी वाढली, तर अपहरण आणि पळवून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये 15,555 वरून 18,695 अशी 20 टक्क्यांची वाढ झाली.