मनमाड (नाशिक) : मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरातही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६४ वर्षीय संशयितास अटक करत त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला.
शिवाय तो लॉन्ड्रीच्या दुकानात इस्त्री करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी दिली. बाबा भागवत असे या संशयित आरोपीचे नाव असून बालकाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर भागवतला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नराधमाचे शहरातील एका भागात लॉन्ड्रीचे दुकान असून त्यात इस्त्री(प्रेस) करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी तो विकृत अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असे. पिडीत पालकांनी तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी बाबा भागवत याला अटक करून त्याच्या विरुद्ध बाल अत्याचार, ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

