

कासा : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, डहाणू तालुक्यातील सूर्या नदीच्या पुराच्या पाण्यात एका व्यक्तीचा अखेर तिसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डहाणू तालुक्यातील पेठ गावातील विठ्ठल जान्या केदार (वय ५५) हे मंगळवार, दि. १ जुलै रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गावालगत वाहणाऱ्या सूर्या नदी जवळ शेती असल्याने ते गेले होते मात्र नदीला पूर ते नदीच्या पुरात वाहून गेले असल्याचा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त करत त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नदी परिसर, आजूबाजूचा भाग तसेच नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांच्या मुलाने कासा पोलीस ठाण्यात धाव घेत वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात मनुष्य बेपत्ता क्रमांक १७/२०२६ अशी नोंद करण्यात आली.
तक्रार मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शोधकार्य सुरू केले. मात्र, सतत कोसळणारा पाऊस आणि सूर्या नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे शोधमोहीम राबविण्यात मोठे अडथळे निर्माण होत होते. अखेर शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी बेपत्ता झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सूर्या नदीच्या चिंचारे परिसरात शोधकार्य सुरू असताना विठ्ठल केदार यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. शहानिशा केल्यानंतर तो मृतदेह विठ्ठल केदार यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मनोर पोलिसांना देण्यात आली असून पोलीस तसेच महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, पालघर जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले आणि ओहळ तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात उतरू नये, तसेच स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.