Parbhani drowning incident | गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवताना महिलेचाही मृत्यू

मोहळा गावावर शोककळा ; आंघोळीस गेलेल्या तरुणींची दुर्दैवी दुर्घटना
Parbhani drowning incident | गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवताना महिलेचाही मृत्यू
Published on
Updated on

सोनपेठ : तालुक्यातील मोहळा गावाजवळील गोदावरी नदीपात्रात रविवारी (दि.१४) सकाळी घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेत दोन सख्ख्या बहिणींसह त्यांना वाचविण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मोहळा गावासह परिसरात शोककळा पसरली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहळा येथील शेतकरी उत्तम देवीदास जाधव यांच्या कन्या उत्कर्षा उत्तम जाधव (वय १८) व समीक्षा उत्तम जाधव (वय १६) या रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गावाजवळील गोदावरी नदीकाठी आंघोळीसाठी गेल्या होत्या. नदीपात्रात उतरल्यावर पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघीही खोल डोहात जाऊन बुडू लागल्या.

Parbhani drowning incident | गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवताना महिलेचाही मृत्यू
Dhule Murder | साक्री तालुक्यात तरुण आणि तरुणीची वेगवेगळ्या ठिकाणी खून, भोंदू गिरीतून हत्याकांड?

दोन्ही मुली संकटात सापडल्याचे लक्षात येताच त्याच गावातील सिंधु दत्ता जाधव (वय ४५) यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने त्यांनाही पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने त्या देखील बुडाल्या. काही क्षणांतच तिघीही नदीच्या पाण्यात दिसेनाशा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकाठावर मोठी गर्दी केली. स्थानिकांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. बोरीच्या झाडाच्या फासाच्या साहाय्याने नदीपात्रात शोध घेतल्यानंतर तिघींचेही मृतदेह पाण्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सोनपेठ येथे हलविण्यात आले.

Parbhani drowning incident | गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवताना महिलेचाही मृत्यू
Drowning Death Solapur | राजस्थानी कारागिरांचा उजनी डाव्या कालव्यात बुडून मृत्यू

या प्रकरणी दौलत साहेबराव जाधव यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात जबाब नोंदविला असून मृत्यूबाबत कोणावरही संशय अथवा तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, एका कुटुंबातील दोन तरुण मुलींचा आणि त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याने मोहळा गावावर शोककळा पसरली आहे. गावातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या सिंधु जाधव यांच्या धाडसाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्या बलिदानाबद्दल ग्रामस्थांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news